प्रियांकांचा प्रभाव नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:20 AM2019-05-25T05:20:40+5:302019-05-25T05:21:16+5:30
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा जिंकता आली. या दारुण पराभवाला त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किती जबाबदार आहेत याविषयी आता चर्चा रंगली आहे. प्रियांका गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झाक दिसते. प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असे. मात्र त्या अनेक वर्षे राजकारणापासून दूरच होत्या. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या काळात काही प्रकरणांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले. गांधी परिवाराला मोदी सरकार कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले.
‘उत्तर प्रदेश पूर्व’ची जबाबदारी
यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या सरटिणीसपदी नेमले व त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली. त्या भागात नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह ४० लोकसभा मतदारसंघ येतात. या परिसरात प्रियांका गांधी यांनी घणाघाती प्रचार केला. त्यासाठी गंगायात्राही काढली. मात्र निवडणूक निकालांतून असे दिसले की, प्रियांका गांधी यांचा मतदारांवर काहीही प्रभाव पडला नाही.
प्रियांका या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अमेठी, रायबरेली मतदारसंघांना भेटी देत असत. त्यांच्या निवडणूक प्रचारातही सहभागी होत. मात्र त्या वेळी सक्रिय राजकारणात नसल्याने झाकली मूठ सव्वा लाखाची होती.
अपयशामुळे प्रियांका गांधींच्या करिष्म्याबद्दल आता विरोधी सूर लागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळावा म्हणून त्या राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याची कामगिरी प्रियांका गांधींवर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची फारशी जबाबदारी त्यांच्यावर नाही. त्यामुळे प्रियांका गांधींवर खूपच टीका होऊ लागली तर हे उद्गार त्यांच्या मदतीस येऊ शकतात. परंतु निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधींचा काहीही प्रभाव पडला नाही हे सत्य लपणार नाही.