प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:25 AM2019-07-20T04:25:52+5:302019-07-20T04:26:07+5:30

संपूर्ण उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

Priyanka Gandhi now holds the charge of Uttar Pradesh Congress | प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे

प्रियांका गांधींकडे आता उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे

Next

- हरीश गुप्ता 
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर प्रदेश काँग्रेसची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे प्रभारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधी यांना सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी करण्यात आलेला नाही. परंतु, बुधवारी अमेरिका भेटीवर रवाना होण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी घेण्यास सांगितले.
अलीकडेच राहुल गांधी यांनी महाराष्टÑ आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. राहुल गांधी २२-२३ जुलै रोजी परतणार असून, त्यानंतरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल, असे समजते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गांधी परिवाराच्या नेतृत्वामुळे ११ कोटींहून अधिक मते मिळाली. प्रियांका गांधी यांच्या हाती काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा दिल्यास मताधार आणखी वाढू शकतो. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी राहण्यास स्पष्ट नकार दिल्याने प्रियांका यांच्यासारखी व्यक्तीच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकते, असे या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियांका यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घेत राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या बैठका घेतल्या आहेत.
।अध्यक्षपदासाठीही प्रियांका यांच्या नावाची चर्चा ?
राहुल गांधी यांच्या जागी अ. भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी प्रियांका गांधी यांची निवड केली जाईल, असा प्रसारमाध्यमांचा होरा आहे. गांधी कुटुंबातील सदस्यच काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकते, असे अनेकांचे ठाम मत असल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक किंवा शैलजा यांच्यापैकी एकाची नियुक्ती करून तात्पुरती व्यवस्था केल्याने पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यात दिरंगाई होईल, असे काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना वाटते.

Web Title: Priyanka Gandhi now holds the charge of Uttar Pradesh Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.