'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला पंक्चर केले, प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 09:44 AM2019-08-31T09:44:37+5:302019-08-31T09:46:06+5:30
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यापासून अर्थजगतात चिंतेचे वातावरण आहे.
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धिदर (जीडीपी) घटल्याची आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाल्यापासून अर्थजगतात चिंतेचे वातावरण असून, घटलेल्या जीडीपीवरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही घटलेल्या जीडीपीवरून मोदी सरकारला टोला लगावला आहे. 'अच्छे दिन'चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा समाचार घेणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात की, अच्छे दिनचा भोंगा वाजवणाऱ्या भाजपा सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला पंक्चर केले आहे हे. घटलेल्या आर्थिक विकासदरावरून स्पष्ट होते. ना जीडीपी वाढत आहे, ना रुपया मजबूत होत आहे. रोजगारही मोठ्या प्रमाणावर घटत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या झालेल्या बट्ट्याबोळासाठी कोण जबाबदार आहे, हे आतातरी स्पष्ट करा.''
आधीच मंदीच्या माऱ्याने रुतण्याच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती आणखी मंदावली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मंदी, कृषी क्षेत्रात झालेली घट, यामुळे भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या नीचांकापर्यंत खाली उतरला असून, तो ५ टक्के झाला आहे.
यापूर्वी २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४.९ टक्के एवढा कमी वृद्धिदर नोंदविला गेला होता. २०१८-१९ मध्ये याच तिमाहीत तो ८ टक्के एवढ्या उच्च स्तरावर गेला होता. यावर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो ५.८ टक्के होता.
२०१९-२० मध्ये जीडीपीचा वृद्धीदर ७ टक्क्यांऐवजी ६.९ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील जून महिन्यात व्यक्त केला होता, तसेच एकूण मागणी वाढवून विकासाबाबतची चिंता दूर करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला होता. रिझर्व्ह बँकेने पहिल्या सहामाहीत जीडीपी वृद्धीदर ५.८ ते ६.६ टक्क्यांच्या दरम्यान व दुसºया सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६.२ टक्के होता. मागील २७ वर्षांतील तो सर्वांत कमी राहिला.