Priyanka Gandhi : "मोदीजी हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:28 PM2023-06-02T12:28:12+5:302023-06-02T12:50:20+5:30
Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली असून आता यात नोंदवलेल्या आरोपांची माहिती समोर आली आहे. 2 एफआयआरमध्ये बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची मागणी आणि विनयभंगाच्या 10 तक्रारी आहेत. एफआयआरमध्ये अशा 10 प्रकरणांचा उल्लेख आहे, यामध्ये विनयभंगाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एफआयआरनुसार, यामध्ये चुकीचा स्पर्श करणं, कोणत्याही बहाण्याने पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करणं, असं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वृत्तपत्राचा रिपोर्ट शेअर करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग केलं. "नरेंद्र मोदीजी, हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?'' असं म्हणत प्रियांका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रियंका यांनी शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये बृजभूषण यांच्याविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक छळाच्या एक किंवा दोन नव्हे तर 10 प्रकरणांचा उल्लेख आहे.
21 एप्रिल रोजी ही तक्रार कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी दोन एफआयआर नोंदवले. या दोन्ही एफआयआर आयपीसी कलम 354, 354A (लैंगिक छळ), 354D आणि 34 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. यात एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा प्रौढ कुस्तीपटूंवरील आरोपांचा समावेश आहे आणि WFI सचिव विनोद तोमर यांचे नाव देखील आहे.
दुसरी एफआयआर एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या आधारावर आहे. यात त्यांनी POCSO कायद्याच्या कलम 10 देखील लागू आहे, ज्यामध्ये पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आहे. 2012 ते 2022 या कालावधीत भारतात आणि परदेशात कथितपणे उल्लेख केलेल्या घटना घडल्या. अल्पवयीन मुलीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीने तिला पकडले, फोटोसाठी पोज देण्याचा बहाणा केला, जाणून बुजून चुकीच्या पद्धतीन स्पर्श केला, असं यात म्हटलं आहे.
6 महिला कुस्तीपटूंपैकी पहिल्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवताना आरोपीने मला त्याच्या टेबलावर बोलावले आणि मला स्पर्श केला. कुस्ती महासंघाच्या कार्यालयात माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श केला. दुसऱ्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, मी मॅटवर झोपले असताना आरोपी माझ्याकडे आला, माझा प्रशिक्षक तिथे नव्हता, तेव्हा माझ्या परवानगीशिवाय माझा टी-शर्ट ओढला, असं या तक्रारीत म्हटले आहे.