प्रियंका गांधी-स्मृती इराणींत वाक्युद्ध
By admin | Published: May 27, 2015 11:47 PM2015-05-27T23:47:11+5:302015-05-27T23:47:11+5:30
रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले.
रायबरेली/ मिदनापूर : रायबरेलीतील आयआयआयटी उभारण्याच्या मुद्यावरून प्रियंका गांधी-वाड्रा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात बुधवारी नव्या वाक्युद्धाला तोंड फुटले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची इराणींची इच्छा आहे. मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? असा खरमरीत सवाल प्रियंकांनी केला. यावर प्रश्न विचारण्याआधी प्रियंकांनी गृहपाठ(होमवर्क) करावा, अशा शब्दांत इराणींनी पलटवार केला.
मंगळवारी गांधी-नेहरू घराण्याला लक्ष्य करणाऱ्या इराणींना बुधवारी रायबरेली दौऱ्यावर आलेल्या प्रियंकांनी सडेतोड उत्तर दिले. अमेठी-रायबरेलीचा विकास करण्याची स्मृती इराणींची इच्छा आहे. तर मग रायबरेलीत आयआयआयटी स्थापन करण्यापासून त्यांना कुणी रोखले आहे? येथील युवा अनेक अडचणींना तोंड देत आहेत. इराणी मनुष्यबळ विकास मंत्री आहे. मग त्या युवांच्या या समस्यांकडे का बघत नाहीत? असे सवाल प्रियंकांनी केले.
प्रियंकांच्या या डिवचणाऱ्या प्रश्नांना इराणींनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था)
मंगळवारी मी अमेठीत होते. त्यामुळे गांधी परिवाराकडून माझ्यावर टीका होणार, याची अपेक्षा मला होतीच. माझ्या अमेठी दौऱ्याने गांधी कुटुंबाच्याही अमेठीच्या फेऱ्या वाढतील, हे मी आधीही बोलले होते. आज मला त्याची प्रचिती येत आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
स्मृती यांनी अमेठी दौऱ्यावेळी सलोन गावात बोलताना, गांधी-नेहरू घराण्यावर जोरदार हल्ला चढवला होता. आजोबा सांगून गेले, आजी सांगून गेल्या आता राहुलही आश्वासने देत आहेत. आतापर्यंत अमेठीच्या जनतेने खोटी आश्वासनेच पाहिली. मात्र आता अमेठीवासींना थेट विकास दिसेल, असे त्या म्हणाल्या.