उत्तर प्रदेशात रंगणार प्रियंका गांधी-स्मृती इराणी यांचे राजकीय द्वंद्व
By admin | Published: March 7, 2016 03:05 AM2016-03-07T03:05:56+5:302016-03-07T03:05:56+5:30
उत्तर प्रदेशात मे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस महायुद्ध छेडले जाणार असताना अचानक प्रियंका गांधी- वढेरा यांचे नाव समोर आले आहे
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात मे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस महायुद्ध छेडले जाणार असताना अचानक प्रियंका गांधी- वढेरा यांचे नाव समोर आले आहे. या राज्यात भाजपकडून मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी आणि प्रियंका यांच्यातील द्वंद्व रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे प्रशांत किशोर हे प्रियकांच्या भाषणाला आक्रमकतेची धार चढवतील, असे समजते.
सध्या हे दोन पक्ष आसामच्या निवडणुकीसाठी जोर लावत आहेत. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या तरूण गोगोई यांची सत्ता उलथविण्यासाठी भाजपने आगप आणि बोडो पीपल्स फ्रंट (बीपीएफ) यांची मदत घेतली आहे; मात्र खरी लढाई दिसेल ती उत्तर प्रदेशात.
उत्तर प्रदेशात मुलायम, मायावती आणि मोदी हे ‘थ्री एम’ फॅक्टर प्रबळ राहिले असले तरी आता ते चित्र मागे पडेल असे दिसते. दिल्ली आणि बिहारच्या पराभवानंतर मोदींचा कमी झालेला प्रभाव विधानसभा निवडणुकीत त्यांचे महत्त्व कमी करणारा ठरेल.
दोन्ही पक्षांची रणनीती पाहता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मुख्य प्रचारक म्हणून प्रियंका गांधी यांना समोर आणू शकते. काँग्रेसने गेल्या २५ वर्षांत प्रादेशिक नेता देण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. आता काँग्रेस आणि मित्र पक्षांनी प्रचाराची सूत्रे प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्याचा सल्ला दिला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांच्यासोबत दोन बैठकी पार पाडत समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अजितसिंग यांच्या नेतृत्वातील रालोद, अपना दल, शांतता पक्ष, डावे पक्ष आणि अन्य फुटीर गट एकाच छत्राखाली आल्यास दलित आणि मुस्लिमांच्या एका गटाची मते समाजवादी पक्ष आणि बसपाकडून हिसकावून घेतली जाऊ शकतात, हे सूत्र ठेवून आघाडी स्थापण्याची कल्पना समोर आली.
भाजपकडे पर्यायी चेहरा नाही...
भाजपकडे या राज्यात सर्वमान्य असा चेहरा नाही. खा. वरुण गांधी यांच्याकडे कौशल्य असूनही ती जबाबदारी सोपविता येत नाही. पराभवाचा धसका असल्यामुळे राजनाथसिंग मान अडकवायला तयार नाहीत. त्यामुळेच इराणी यांना मुख्य प्रचारकर्त्याच्या रुपात समोर आणले जाईल असे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
जेएनयूमधील वादाच्या पार्श्वभूमीवर इराणी यांची संसदेतील आक्रमक भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक टिष्ट्वटर हँडलवर टाकले होते. त्यामुळे तर्कवितर्कांत भरच पडली. गेल्या लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांच्याशी दोन हात करताना दाखविलेली भाषणातील आक्रमकता त्यांना पक्षात वरच्या पंक्तीत स्थान देणारी ठरली.