प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, लखनौमध्ये रोड शो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:35 AM2019-02-11T05:35:59+5:302019-02-11T05:40:01+5:30
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर उद्या, सोमवारी येत आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच त्या राज्याच्या दौ-यावर उद्या, सोमवारी येत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हेही असतील.
या तिघांचे लखनौमध्ये भव्य स्वागत करण्याचे प्रदेश काँग्रेसने ठरविले आहे. त्यांचा रोड शोही आयोजिण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे तिन्ही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी सोमवारीच दिल्लीला परतण्याची शक्यता असून, प्रियंकाचा दौरा मात्र चार दिवसांचा आहे. लखनौमध्ये प्रियंका गांधी व ज्योतिरादित्य शिंदे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा असून, त्यातील ४२ जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. त्या व ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाºयांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
चुरशीच्या लढती?
कोणत्याही राज्यापेक्षा उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त खासदार लोकसभेत निवडून जातात. आगामी लोकसभा निवडणुकांत या राज्यातून आपले जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत म्हणून भाजप व काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसला दूर ठेवून बसपा व सपाने युती केल्याने राज्यात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्याने भाजप काहीसा चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने रायबरेली व अमेठी या दोनच जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने ७१, त्याचा मित्रपक्ष अपना दलने २ जागांवर विजय मिळविला होता.