'प्रियांका गांधींनीच केला सुरक्षा नियमांचा भंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 02:14 AM2019-12-31T02:14:11+5:302019-12-31T02:14:28+5:30
सीआरपीएफचा दावा; संरक्षणात त्रुटी नाही
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सुरक्षाविषयक नियमांचा भंग करून लखनऊमध्ये बुलेटप्रूफ गाडीचा वापर न करता स्कूटीवरून प्रवास केला. प्रियांका गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नाही असा दावा सीआरपीएफने केला आहे. गांधी परिवाराला असलेली एसपीजी सुरक्षा काढून केंद्र सरकारने आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे.
सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक पी. के. सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाण्याचा निर्णय प्रियांका गांधी यांनी आयत्यावेळी घेतला. त्यावेळेस त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याने प्रियांका गांधी एका स्कुटीवर मागे बसल्या व दारापुरी यांचे घर ज्या परिसरात आहे तिथे गेल्या. या सर्व गोष्टी करताना प्रियांका गांधी यांनी तीनवेळा नियमांचा भंग केला.
आरोपामुळे गदारोळ
प्रियांका गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलीस अधिकाऱ्याने धमकी दिली अशी तक्रार काँग्रेसने सीआरपीएफच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा ताफा अडवला. त्यांनी माझा गळा दाबला आणि धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी केल्याने गदारोळ माजला होता.
प्रियांका गांधी यांनी सुरक्षाविषयक नियम मोडू नयेत असे सीआरपीएफतर्फे त्यांना नेहमी सांगण्यात येते असा दावाही या दलाने केला आहे.