उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी होणार सक्रिय
By admin | Published: October 25, 2016 04:55 AM2016-10-25T04:55:36+5:302016-10-25T04:55:36+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठीच्या वॉर रूममध्ये प्रियांका
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठीच्या वॉर रूममध्ये प्रियांका यांनी सर्व नेत्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीला राहुल गांधी मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
या बैठकीत प्रियांका यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे समजते. बैठकीला गुलाम नबी आझाद, शीला दीक्षित, राज बब्बर, संजय सिंह यांच्यासहीत उत्तर प्रदेश काँग्रेसचे सर्व उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत पक्षाच्या नेत्यांतर्फे उत्तर प्रदेशात प्रचारासाठी यात्रा काढण्यात आल्या, त्याचा काँग्रेस पक्षाला किती उपयोग आणि फायदा होईल, हे या बैठकीत प्रियांका यांनी या नेत्यांकडून जाणून घेतले. ग्रामीण भागांत यात्रांचा उपयोग होईल आणि शहरी भागांत विशेष फायदा होण्याची शक्यता कमी आहे, असे नेत्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील शहरांमधील लोकांमध्ये काँग्रेस हा अस्तित्व नसलेला पक्ष आहे आणि काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी समझोता केला, तरी त्याचा पक्षाला उपयोग होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांनी प्रियांका यांच्या कानावर घातले.
महत्त्वाची भूमिका
काँग्रेसने २ ते १४ नोव्हेंबर या काळात राज्यात पुन्हा प्रचार यात्रा काढण्याचे ठरविले आहे. प्रियांका गांधी यांनी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशातील नेत्यांकडून माहिती घेतली, ते पाहता, त्या निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय होतील वा महत्त्वाची भूमिका बजावतील, असे काँग्रेस नेत्यांना निश्चितपणे वाटत आहे. निवडणुकांची घोषणा होताच, यावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. बहुधा त्याचाच भाग म्हणून प्रियांका गांधी यांनी ब्लॉक स्तरावरही बैठका घ्याव्यात, असे नेत्यांना सुचविले आहे.