उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा असतील प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:14 AM2021-11-16T06:14:22+5:302021-11-16T06:14:36+5:30
निवडणूक लढवायची की नाही हे त्याच ठरवितील
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी या पक्षाच्या चेहरा असतील; मात्र निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय स्वत: त्याच घेतील, असेही पक्षाने म्हटले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीशी लावला असून, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभांना गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल विचारले असता, अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस बाजीराव खाडे म्हणाले, “ या वेळीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा जात हा काही एकमेव घटक असणार नाही.” खाडे हे उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करीत आहेत. काँग्रेसला सर्व जाती आणि समाजातील सगळ्या घटकांचा पाठिंबा मिळत आहे, कारण योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपविरोधात लोकभावना आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजप, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे मतदारांसमोर असताना काँग्रेसही आपला चेहरा आणणार का, यावर बाजीराव खाडे म्हणाले,“त्याची गरज नाही. प्रियांका गांधी या अगदी आघाडीवर राहून संघर्ष करीत आहेत.