प्रियंका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा?
By admin | Published: January 24, 2017 01:14 PM2017-01-24T13:14:37+5:302017-01-24T13:17:06+5:30
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यानंतर प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील पर्दापणाबाबत सध्या बरीच चर्चा आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यानंतर प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील पर्दापणाबाबत सध्या बरीच चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी या काँग्रेस अध्यक्ष आणि आई सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदार संघ रायबरेली येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात आहे.
प्रकृतीच्या कारणांमुळे सोनिया गांधींनी राजकारणातील आपला सहभाग सध्या बराच मर्यादित केला आहे, अशातच त्यांच्या लोकसभा मतदारसंघाची कमान आता प्रियंका गांधी सांभाळणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्रियंका निवडणुकांच्या प्रचारात सक्रीय झाल्याने राहुल गांधींच्या कारर्कीदीवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे काँग्रेस पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोनियांनंतर पक्षाचा राजकीय वारसा राहुल गांधींकडेच सोपवण्यात येणार असल्याचेही पार्टीकडून सांगण्यात येत आहे. मात्र यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
काँग्रेसने समाजवादी पार्टीसोबत केलेल्या आघाडीच्या प्रक्रियेत प्रियंका यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे, त्यांची ही भूमिका काँग्रेसने जाहीररित्या स्वीकारलीही आहे. एवढंच नाही तर 'काँग्रेस आणि सपामध्ये आघाडी होण्यासाठी सर्व घडामोडींमध्ये प्रियंका गांधींनी मोलाची भूमिका बजावली', असे ट्विट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी केले.
पार्टीसंदर्भातील रणनीतींबाबत प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अशा पद्धतीने जाहीरपणे चर्चा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी औपचारिकरित्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याचीही जोरदार चर्चा सध्या देशाच्या राजकारणात सुरू आहे. सोनिया गांधी यांनी 1999 साली अमेठीतून पहिली निवडणूक लढवली होती. 2004 मध्ये राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचे गड मानले जातात. तर 1999 सालापासून प्रियंका सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचार व्यवस्थापनाचे काम पाहत आल्या आहेत.
पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी इंदिरा गांधी यांचा मतदारसंघ असलेले रायबरेली प्रियंका यांना निवडणूक लढवण्यासाठी योग्य ठरले, असे पार्टीचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रियंका यांनी अशा प्रकारे राजकारणात येणे आणि पार्टीकडून त्याला दुजोरा मिळणे, हा विचारपूर्वक घेण्यात आलेला निर्णय आहे. सोनियांकडून राजकारणाला सोडचिठ्ठी मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
राहुल गांधी यांचा बहिण प्रियंकावरील विश्वासही मोठ्या प्रमाणात असून सोनियांव्यतिरिक्त त्या राहुल गांधींच्या कामातही सहकार्य करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रियंका गांधी सोनिया गांधी यांच्या जागी पाहायला मिळणार का? याबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे.