ट्यूमरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी प्रियंका गांधींची मदत, खाजगी विमानाने दिल्लीला पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 09:05 AM2019-05-11T09:05:58+5:302019-05-11T09:07:52+5:30
ट्यूमर या भयंकर आजाराने पिडित मुलीची गंभीर परिस्थिती पाहून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी प्रयागराज येथून खाजगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराला काहीच दिवस शिल्लक आहेत. या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा घडलं आहे. ट्यूमर या भयंकर आजाराने पिडित मुलीची गंभीर परिस्थिती पाहून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी प्रयागराज येथून खाजगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं.
प्रयागराज येथे कमला नेहरू रुग्णालयात एक मुलगी ट्यूमर आजारामुळे उपचारासाठी दाखल होती. मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने तिची तब्येत ढासळत असल्याचं दिसून आलं. मुलीच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने तिच्या कुटुंबीयांनी प्रियंका गांधी यांच्याकडे मदतीची याचना केली. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रियंका गांधी यांनी तातडीने मुलीच्या मदतीसाठी पाऊलं उचलली.
प्रियंका गांधी इलाहाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार योगेश शुक्ला यांच्या प्रचारासाठी आलेल्या असताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल, माजी खासदार मोहम्मद अजहरुद्दीन यांना त्या पिडित मुलीला मदत करण्याची सूचना केली. या मुलीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. प्रचाराच्या कार्यक्रमात व्यस्त असणारे काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रियंका गांधी यांच्या सूचनेचं पालन करत पिडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्लीला घेऊन गेले.
काँग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र तिवारी यांनी सांगितले की, या पिडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद अजहरुद्दीन आणि हार्दिक पटेल गेले. दरम्यान ही पहिलीच वेळ नाही जेव्हा प्रियंका गांधी यांनी अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत केली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका झोपडीत राहणाऱ्या 22 वर्षीय आशिष नावाच्या दिव्यांग मुलाची भेट घेतली होती. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रस्त्यात अडकलेल्या अॅम्ब्युलन्ससाठीही प्रियंका गांधी यांनी वाट मोकळी करुन दिली होती. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी केलेल्या या कृत्याचं अनेकांनी कौतुक देखील केलं होतं.