स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी प्रियांका गांधींची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:05 AM2024-05-09T08:05:49+5:302024-05-09T08:06:12+5:30
आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या ...
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या आहेत. काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले असले तरी, अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रियांका स्वतः निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या भूमिकेत आहेत.
प्रियांका सध्या दररोज अमेठी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत आहेत या भागात वर्चस्व असलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. तसेच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची अमेठीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भूपेश बघेल यांची रायबरेलीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.
नेमके काय करणार?
हे दोन नेते कोणतीही निवडणूक सभा घेत नाहीत तर, पडद्याआडून निवडणुकीचे व्यवस्थापन बघत आहेत. किशोरीलाल शर्मा यांना उमेदवार बनवण्यामागे काँग्रेसची रणनीती अशी आहे की, स्मृती इराणींना पराभूत करून त्यांना संदेश द्यायचा आहे की, या निवडणुकीत एका छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याने केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला. त्यामुळे प्रियांका यांनी पुढील १३ दिवस तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप राहुल विरोधात खोटे बोलण्यात गुंतलेली
प्रियांका गांधी यांनी आरोप केला की, भाजपची संपूर्ण यंत्रणा राहुल गांधींविरोधात खोटे पसरवण्यात गुंतलेली आहे. भाजप धर्म, जात आणि मंदिर-मशिदींबद्दल बोलतो, पण लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलत नाही. भाजपला राज्यघटना बदलायची आहे, पण निवडणुकीत याचा त्रास सहन करावा लागेल, हे लक्षात आल्यावर त्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.
लोकांना वाटते की त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यांना उपाय हवा आहे. सरकारने वाढलेली बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी काय केले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. मी पंतप्रधानांना बेरोजगारीवर बोलण्याचे आव्हान देते. बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे.
- प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या