धोका देत असल्याचा संशय असल्याने प्रेयसीने कापलं प्रियकराचं गुप्तांग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:51 AM2017-09-22T11:51:08+5:302017-09-22T11:51:44+5:30
केरळच्या मल्लपुरम शहरात एका तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचं गुप्तांग कापलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला आपला प्रियकर फसवणूक करत असल्याचा संशय होता. या संशयातूनच तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.
मलप्पुरम - केरळच्या मल्लपुरम शहरात एका तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचं गुप्तांग कापलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला आपला प्रियकर फसवणूक करत असल्याचा संशय होता. या संशयातूनच तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रियकराने वेगळी माहिती दिली असून पोलीस तपास करत आहे. पीडित तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तांग कापले जाण्याची ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील कुट्टिपुरम येथील एका लॉजमध्ये घडली आहे. 30 वर्षीय तरुणी आणि पीडित तरुणामध्ये प्रेमसंबंध होते असं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी तरुणीला अटक केली. अटक केल्यानंतर तरुणीने आपला गुन्हा कबूल केला. छोट्या चाकूच्या मदतीने आपण आपल्या प्रियकरावर हल्ला केला अशी माहिती आरोपी तरुणीने पोलिसांना दिली.
पीडित तरुणाचीही ओळख पटली आहे. तरुणाचं नाव इरशाद असून पुराथूर येथील राहणारा आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणाने आपणच आपलं गुप्तांग जखमी करुन घेतल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोघांनाही लॉजमध्ये एक रुम बूक केला होता. सर्व घटना रुममध्येच घडली आहे. चाकूने झालेल्या हल्ल्यानंतर इरशाद रुममधून बाहेर आला आणि धावत सुटला. लॉजच्या कर्मचा-यांनीच इरशादला रुग्णालयात दाखल केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडित तरुणी घटस्फोटित असून गेल्या अडीच वर्षांपासून इरशादसोबत तिचे प्रेमसंबंध आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, इरशादरने कोणालाही न सांगता तिच्याशी लग्न केलं होतं आणि अधिकृतपणे त्यांची नोंदणीही केली होती. पोलिसांना शंका आहे की, इरशाद दुस-या तरुणीसोबत लग्न करण्याचा प्लान आखत होता, ज्याची माहिती आरोपी तरुणीला मिळाली होती. यामुळेच तिने हल्ला करत इरशादचं गुप्तांग कापून टाकलं.
पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरु आहे. आरोपी तरुणी आणि पीडित तरुणांना वेगवेगळी माहिती दिली असल्याने पोलीस नेमकं तथ्य काय आहे याची माहिती मिळवत आहेत.