माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:07 PM2024-06-24T15:07:44+5:302024-06-24T15:59:24+5:30

Bhartruhari Mahtab : ओडिशाचे दिग्गज नेते भर्तृहरी महताब यांना १८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

pro tem speaker bhartruhari mahtab seven time mp from cuttack son of former cm harekrishna | माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब?

माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब?

नवी दिल्ली :  १८ व्या लोकसभेचे संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. हे सत्र सुरू होताच भर्तृहरी महताब यांचे नाव चर्चेत आहे. हे नाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. भर्तृहरी महताब यांच्या नावावरून विरोधी पक्षाचे नेते केंद्रातील मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत, भर्तृहरी महताब? जे अचानक चर्चेत आले आहेत.

ओडिशाचे दिग्गज नेते भर्तृहरी महताब यांना १८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ते सलग सात वेळा खासदार राहिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यानंतर भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी यांना लोकसभा सदस्यांची शपथ दिली.

ओडिया दैनिकाचे संपादक
भर्तृहरी महताब हे ओडिशातील एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील हरेकृष्ण महताब हे ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री होते. भर्तृहरी महताब यांचा जन्म १९५७ मध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण भद्रकमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी उत्कल विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. भर्तृहरी महताब हे प्रजातंत्र या त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या ओडिया दैनिकाचे मालक आहे. याशिवाय ते या वृत्तपत्राचे संपादकही आहेत.

बीजेडीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला
भर्तृहरी महताब हे ओडिशाच्या कटक मतदारसंघातून ७ वेळा खासदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिजू जनता दलात (बीजेडी) होते. बीजेडीकडून ते अनेकवेळा खासदार म्हणून निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी  भर्तृहरी महताब यांनी बीजेडीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने कटकमधून भर्तृहरी महताब यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भर्तृहरी महताब यांनी ५७,०७७ मतांनी विजय मिळवला आणि सलग सातव्यांदा लोकसभेत पोहोचले.
 

Web Title: pro tem speaker bhartruhari mahtab seven time mp from cuttack son of former cm harekrishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.