बाबा रामपालच्या अडचणी आणखी वाढल्या
By admin | Published: November 21, 2014 03:15 AM2014-11-21T03:15:16+5:302014-11-21T03:15:16+5:30
हजारो पोलिसांनी सलग तीन दिवस राबविलेल्या मोहिमेनंतर न्यायालयीन अवमाननाप्रकरणी अटक करण्यात आलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे़
चंदीगड/बरवाला : हजारो पोलिसांनी सलग तीन दिवस राबविलेल्या मोहिमेनंतर न्यायालयीन अवमाननाप्रकरणी अटक करण्यात आलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे़ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने गुरुवारी २००६ मधील एका हत्येप्रकरणी त्याला दिलेला जामीन रद्द केला़ या प्रकरणाची सुनावणी आता २८नोव्हेंबरला होणार आहे़ तोपर्यंत रामपालला न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे़
हरियाणाचे महाधिवक्ता आणि हिस्सारच्या बरवाला ठाण्याच्या एसएचओंनी अवमाननाप्रकरणी रामपालला अटक झाल्याचे न्यायालयाला सांगताच न्या़ एम़ जयपाल आणि न्या़ दर्शन सिंह यांच्या पीठाने तात्काळ संबंधित हत्येप्रकरणी बाबाचा जामीन रद्द केला आणि त्याला याप्रकरणी अटक करण्याचे आदेश दिले़
२००६ मध्ये रोहतक जिल्ह्याच्या आश्रमात झालेल्या धुमश्चक्रीनंतर एका व्यक्तीची हत्या झाली होती़ याप्रकरणी रामपाल याच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदवण्यात आला होता़ बाबा याप्रकरणी जामिनावर होता़ तो सुनावणीला सातत्याने गैरहजर राहात होता. त्यामुळे त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी केले होते. गेल्या १५ दिवसांपासून आपले समर्थक आणि ‘खासगी कमांडों’ना समोर करून बाबा रामपाल सतपाल आश्रमात दडून बसला होता़ रामपालला अटक होऊ नये यासाठी त्याच्या १५ हजार भक्तांनी आश्रमात ठाण मांडून पोलिसांना कारवाई करण्यास रोखले होते. मंगळवारी रामपाल समर्थक आणि पोलीस यांच्यादरम्यान जोरदार धुमश्चक्री उडाली होती़ यात सुमारे २०० लोक जखमी झाले होते़ यादरम्यान सहा जणांचा गूढ मृत्यूही झाला होता़ मात्र बुधवारी रात्री उशिरा अनेक दिवसांपासूनची तणावपूर्ण कोंडी फोडत पोलिसांनी रामपालला जेरबंद केले होते़ गुरुवारी त्याला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (वृत्तसंस्था)