रोहयोतील विहिरींना निधीची अडचण
By admin | Published: April 20, 2015 01:42 AM2015-04-20T01:42:01+5:302015-04-20T01:42:01+5:30
सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे.
वर्धा : सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जात आहे. या योजनेत जाचक अटी लादण्यात आल्या आहेत़ शिवाय निधीची अडचण असल्याने शेतकरीच संकटात सापडले आहेत़
कार्यालय गट ग्रा़पं़ हिवरा (कावरे) अंतर्गत असलेल्या कोल्हापूर (राव) या गावातील व परिसरातील लाभार्थ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कामे सुरू केलीत; पण निधी मिळत नसल्याने परिसरातील लाभधारक शेतकरी त्रस्त झाले आहे. संबंधित विभागाने मोजमाप करून विहिरीचे खोदकाम सुरू करा, असा तोंडी आदेश दिला. यावरून अल्प व अत्यल्प भूधारक गरीब शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन आपल्या विहिरीची कामे सुरू केली़ यात कामावरील मजुरांना आठवड्याचे पैसे द्यावे लागतात़ शासनाकडून निकषानुसार विहिरीचे पैसे काढताना वेळ होतो. यामुळे पैशासाठी मजूर थांबत नाहीत़ मजुरांना वेळेवर पैसे कुठून द्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. हे वर्ष आधीच शेतकऱ्यांसाठी नापिकीचे ठरले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही मिळाली नाही. यामुळे काही शेतकरी परिस्थितीला झुंज देत आत्महत्या करीत आहे. विहिरीच्या लाभार्थ्यांवरही हीच वेळ आली आहे़ अशा या मंदीच्या काळात शासनाने सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीचा लाभ दिला; पण त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही़ निधी उपलब्ध होत नसल्याने गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे़ कर्ज घेऊन विहिरीच्या खोदकामाची मजुरी दिली; पण पूढील खर्च शेतकऱ्यांना झेपणारा नाही़
विहिरीच्या कामाचे मोजमाप व संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी झाल्याशिवाय निधी मिळत नाही. संबंधित अधिकारी मात्र तिकडे भटकतही नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ शेतकऱ्यांच्या विहिरींचे खोदकाम २० ते २५ फुटापर्यंत झाले आहे; पण मोजमाप व पाहणी झाली नाही. यामुळे या विहीरीचा फास शेतकऱ्यांच्या गळाभोवती आवळला जात आहे. कर्ज घेऊन विहिरीचे खोदकाम केले; पण निधी मिळणार की नाही, या साशंकतेमुळे शेतकऱ्यांत धास्ती पसरली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)