मतदार यादी नाव नोंदणीसाठी पदवीधारकांना अडचणी
By admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:33+5:302015-04-20T13:05:00+5:30
पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
जळगाव : पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ नुक ताच पार पडला. या समारंभासाठी अनेक पदवीधारकांनी पाठ फिरविली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. त्यात ज्या पदवीधारकांना त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयांकडे पाठविले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच परीक्षा शुल्क भरताना पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे शुल्क आकारले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पाठविण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची आहे; असे महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांना सांगितले जात असल्यामुळे विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करताना अडचण येत आहे. नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र अनिवार्य असताना अनेक विद्यार्थी त्यांचे पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यापीठात येत असल्याचे दिसत आहे. याबाबत परीक्षा नियंत्रक धनंजय गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
दहा दिवसांची मुदतवाढ मिळावी
दरम्यान, पदवीधारकांच्या नाव नोंदणीसाठी विद्यापीठातर्फे २० एप्रिलपर्यंतच मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अनेकांचे पदवी प्रमाणपत्र विद्यापीठातच पडून आहेत. यासंदर्भात महाविद्यालयात चौकशी केल्यानंतर विद्यापीठाकडून अद्याप पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात आलेले नाही. विद्यापीठात चौकशी करा, असे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने विद्यापीठात येऊन पदवी प्रमाणपत्र काढावे लागत असून नाव नोंदणीसाठी दहा दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सिनेट सदस्य ॲड. अमित दुसाने यांनी केली आहे.