वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याची प्रकिया सुरु, उद्या तारीख सांगणार; किरेन रिजिजू यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:44 IST2025-03-31T18:43:14+5:302025-03-31T18:44:37+5:30
Waqf Amendment Bill latest News: अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपणार आहे. यामुळे २ एप्रिलला हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याची प्रकिया सुरु, उद्या तारीख सांगणार; किरेन रिजिजू यांची घोषणा
वक्फ विधेयक मांडण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांनी बोलावे, त्यांच्या सर्व आक्षेपांवर उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे, हे विधेयक कधी मांडणार याची तारीख उद्या जाहीर करणार अशी घोषणा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. जे वक्फ विधेयकाला विरोध करत आहेत, ते ताकदवान लोक आहेत. त्यांना सामान्यांशी काही देणेघेणे नाही, असेही रिजिजू यांनी म्हटले आहे.
अल्पसंख्यांकांवर कोणताही अन्याय या विधेयकात केलेला नाही. हे जे विरोध करणारे लोक आहेत, त्यांनीच वक्फच्या संपत्ती बळकावलेल्या आहेत. ते सामान्य लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली.
टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतू ही टीका करण्यासाठी काहीतरी आधार असायला हवा. धार्मिक बांधिलकी आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टी सोडून काही संघटना या विधेयकाला पाठिंबा देत आहेत. हे विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनात जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित होईल, असे रिजिजू म्हणाले.
विधेयक तयार आहे, सर्व पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात येऊन चर्चा करावी अशी विनंती करत आहे. बाहेर जाऊन दिशाभूल करू नका, असे आवाहन त्यांनी केले. संसदेबाहेर विक्रमी संख्येने सल्लामसलत आणि चर्चा झाल्या आहेत. आता सभागृहातील चर्चेत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
ऑगस्ट २०२४ मध्ये संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) कडे पाठवलेले वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा सादर केले जाईल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी म्हटले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिल रोजी संपणार आहे. यामुळे २ एप्रिलला हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.