झाकीर नाईकच्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
By admin | Published: November 1, 2016 04:41 PM2016-11-01T16:41:16+5:302016-11-01T16:57:46+5:30
वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची एफसीआरए नोंदणी रद्द करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. गृहमंत्रालय दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत झाकीरच्या बिगरशासकीय संघटनेवर बंदी घालण्याची तयारी करत असून, त्यादृष्टीने कॅबिनेटच्या बैठकीसाठी गृहमंत्रालयाने मसुदादेखील तयार केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर नाईक याच्या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी त्याच्या संस्थेकडून होणाऱ्या सर्व अवैध कृत्यांचा तपास करण्यात आला. त्यानंतर या संस्थेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तसेच पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक चॅनेलचा झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे. झाकीरची संस्था पीस टीव्हीसाठी आक्षेपार्ह कार्यक्रमांची निर्मिती करते. तसेच त्यापैकी बरेच कार्यक्रम हे भारतात तयार केले जातात, असेही आढळून आले आहे.
तरुणांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हे झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावीत झाल्याचे समोर आल्यानंतर झाकीर नाईक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.