मोठ्या पडद्यावर दिसणार 'सर्जिकल स्ट्राईक', या निर्मात्याने सुरू केली सिनेमाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:01 AM2018-01-30T11:01:15+5:302018-01-30T11:02:58+5:30
भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये केलेलं सर्जिकल स्टाईक प्रेक्षकांना आता सिनेमाच्या रूपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
मुंबई- भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये केलेलं सर्जिकल स्टाईक प्रेक्षकांना आता सिनेमाच्या रूपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लेखक नितीन ए. गोखले यांनी लिहिलेल्या 'सिक्योरिंग इंडिया द मोदी वे: पठाणकोट, सर्जिकल स्टाईक अॅण्ड मोअर' या पुस्तकावर सिनेमा येणार आहे. ऑडबॉल मोशन पिक्टरने सिनेमा तयार करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. निर्माते नितीन उपाध्याय यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यासंदर्भातील माहिती दिली. 2016मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केलं. हेच सर्जिकल स्ट्राईक आता निर्माते नितीन उपाध्याय मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सिनेमा बनविण्यासाठी उपाध्याय आणि गोखले यांना संपूर्ण मदत करण्यातं आश्वासन दिलं आहे. मी ऑडबऑल मोशन पिक्चर्सद्वारे नितीन गोखले यांच्या पुस्तकावर सिनेमा येणार असल्याच्या निर्णयाने खूश आहे, असं मनोहर पर्रीकर यांनी म्हंटलं. सिनेमाच्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांना सरकारद्वारे देशाच्या सुरक्षेविषयी उचलल्या जाणाऱ्या पावलांची माहिती मिळेल, असंही पर्रीकर म्हणाले.
सिनेमा समाजाचा आरसा असतो. सिनेमा लोकांना उस्ताही आणि प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो, असं मत निर्माते नितीन उपाध्याय यांनी व्यक्त केलं.