देशात ७८ लाख टन साखरेचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 11:15 PM2020-01-02T23:15:00+5:302020-01-02T23:15:02+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ लाखांनी उत्पादनात घट
पुणे : डिसेंबर महिना अखेरीस देशभरात ७७.९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ३३.७७ लाख टनांनी घट झाली आहे. त्यात उत्तरप्रदेशचा वाटा ३३.१६ आणि महाराष्ट्राचा १६.५० लाख टन असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली.
देशात ४३७ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षी याच काळात ५०७ साखर कारखाने सुरु होते. तर, डिसेंबर २०१८ अखेरीस १११.७२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधे ऊस पिकाला फटका बसल्याने साखरेचे उत्पादन घटले आहे. गेले सलग दोन हंगाम १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात यंदा एक महिना उशीरा गाळप हंगाम सुरु झाला.
डिसेंबर अखेरीस महाराष्ट्रात १३७ साखर कारखाने सुरु झाले असून, साडेसोळा लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात १८७ कारखान्यांनी ४४.५७ लाख टन साखर उत्पादित केली होती. तसेच, राज्याचा सरासरी साखर उतारा देखील साडेदहा टक्के होता. यंदा साखर उतारा १० टक्क्यापर्यंत खाली आला आहे. तसेच, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे.
उत्तरप्रदेशातील ११९ साखर कारखाने सुरु झाले असून, ३३.१६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर, सरासरी साखर उतारा १०.७१ टक्के आहे. डिसेंबर २०१८ साली येथे ३१.०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, साखर उतारा १०.८४ टक्के इतका होता. कर्नाटकातील ६३ कारखान्यांनी १६.३३ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळात २१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
गुजरातमधील १५ कारखान्यांनी २.६५, आंध्रप्रदेशातील १८ कारखान्यांनी ९६ हजार टन व तमिळनाडूतील १६ कारखान्यांनी ९५ हजार टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. बिहारमधे २.३३, हरयाणा १.३५, पंजाब १.६०, मध्यप्रदेशात १ व उत्तराखंडमधे १.०६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात घट होणार असल्याने साखरेचे टिकून आहेत. सध्या उत्तरभारतात ३२५० ते ३३५० आणि दक्षिण भारतात ३१०० ते ३२५० रुपये प्रतिक्विंटल साखरेचे दर आहेत.
--
साखरेची २५ लाख टनांची निर्यात
आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तिमाहीमधे देशातून २५ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले असून, साखरेचा पुरवठा वेगात सुरु आहे. काही कारखान्यांनी मिळालेल्या कोट्यानुसार शंभरटक्के साखर निर्यात केली आहे. ज्या कारखान्यांनी अद्याप साखर निर्यात केलेली नाही, त्यांचा कोटा इतर कारखान्यांना द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.