भारतामध्ये चौथ्या कोरोना प्रतिबंधक लसीचेही उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 06:10 AM2020-08-20T06:10:22+5:302020-08-20T06:10:36+5:30
, झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोविड शिल्ड (आॅक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : हैदराबादमधील आणखी एक कंपनी बायोलॉजिकल ई (बीई) ही देखील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणार असून त्यामुळे भारतात कोव्हॅक्सिन (उत्पादक : भारत बायोटेक-आयसीएमआर), झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोविड शिल्ड (आॅक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
इंडियन व्हॅक्सिन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, लस तयार करण्यासाठी आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीशी करार केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने निधी पुरवावा या मागणीसाठी इंडियन व्हॅक्सिन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या सदस्यांची भेट घेतली. केंद्रीय जैवतंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारीत हे कौन्सिल येते.
>भारताला ६० ते ७० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस लागतील असा अंदाज लस या विषयावरील कृती गटाचे प्रमुख व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी नुकताच व्यक्त केला होता. मात्र कोरोना प्रतिबंधक लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच नेमके किती डोस विकत घेणार हे भारत जाहीर करेल असे पॉल म्हणाले होते.
>भारताने कोणाकडूनही लसखरेदीसाठी अद्याप करार केलेले नाहीत. मात्र असे करार काही कंपन्यांशी अमेरिका, इंग्लंड, युरोपीय समुदायातील देश, स्वित्झर्लंड, जपान यांनी केले आहेत.
ते जागतिक स्तरावरील औषध कंपन्यांना या लसीपोटी ५ अब्ज डॉलर देणार आहेत.