भाजपाबाबतची भविष्यवाणी फेसबुकवर टाकणे प्राध्यापकाला पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:37 PM2019-05-08T16:37:43+5:302019-05-08T16:38:09+5:30
मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या विक्रम विश्वविद्यालयाच्या ज्योतिषशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापकाला भाजपाबाबतची भविष्यवाणी महागात पडली आहे.
इंदौर : मध्यप्रदेशमधील उज्जैनच्या विक्रम विश्वविद्यालयाच्या ज्योतिषशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापकाला भाजपाबाबतची भविष्यवाणी महागात पडली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. या प्राध्यापकाने फेसबुकवर लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतील याचे भविष्य वर्तविले आहे.
विक्रम विश्वविद्यालयाचे कुलसचिव डी के बग्गा यांनी पीटीआयला सांगितले की, विद्यापीठाच्या ज्योतिषशास्त्र विभागाचे अध्यक्ष राजेश्वर शास्त्री मुसळगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. यावरून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही पोस्ट त्यांनी 28 एप्रिलला टाकली होती. यामध्ये त्यांनी भाजपाला 300 च्या आसपास आणि एनडीएला 300 च्या पार अशी पोस्ट केली होती.
मुसळगावकर यांनी दुसऱ्याच दिवशी माफी मागून ही पोस्ट हटविली होती. या माफीनाम्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, माझ्याकडून हे भविष्य केवळ ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी करण्यात आले होते. यामुळे या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.
मुसळगावकर यांच्या निलंबनानंतर मध्यप्रदेशमध्ये विरोधी पक्ष भाजपाने यावर टीका केली आहे. भाजपाचे प्रवक्ते उमेश शर्मा यांनी सांगितले की, विविध विषयांवर भविष्य सांगणे हे विद्वान ज्योतिषांचे कामाचा भाग आहे. यामुळे मुसळगावकर यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे. हा आदेश तातडीने रद्द करावा.