Video: प्रवचन देता देता अचानक हार्ट अटॅक आला अन् व्यासपीठावरच कोसळले, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:27 AM2022-10-23T11:27:19+5:302022-10-23T11:28:58+5:30
हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी अयोध्याहून आलेले स्वामी रत्नेश्वर यांचे प्रवचन सुरू होते. त्यांचे प्रवचन संपल्यानंतर ७ च्या सुमारास रणंजय सिंह व्यासपीठावर येऊन उपस्थित भाविकांना संबोधत होते
छपरा - बिहारच्या छपरा जिल्ह्यात मारुती मानस मंदिर परिसरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी प्रवचन देताना मंदिराचे मुख्य सचिव आणि निवृत्ती प्रोफेसर रणंजय सिंह यांना अचानक ह्दयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये शोककळा पसरली.
हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी अयोध्याहून आलेले स्वामी रत्नेश्वर यांचे प्रवचन सुरू होते. त्यांचे प्रवचन संपल्यानंतर ७ च्या सुमारास रणंजय सिंह व्यासपीठावर येऊन उपस्थित भाविकांना संबोधत होते. तेव्हा अचानक त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते मंचावरच खाली कोसळले. रणंजय सिंह खाली पडल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तात्काळ ट्रस्टच्या इतर सदस्यांनी रणंजय सिंह यांना छपरा येथील सदर रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले.
डॉक्टरांनी म्हटलं की, रणंजय सिंह यांचा मृत्यू हार्टअटॅकनंतर लगेच झाला होता. जेव्हा प्रोफेसर रणंजय लोकांना संबोधित करत होते. तेव्हा अनेकजण तिथे मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. ज्यावेळी रणंजय सिंह यांना ह्दयविकाराचा झटका आला तेव्हा ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांनी रणंजय सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रवचन देताना बिहारमधील निवृत्त प्राध्यापकाचा व्यासपीठावरच मृत्यू #RananjaySinghpic.twitter.com/f01ShCFmKg
— Lokmat (@lokmat) October 23, 2022
त्याचबरोबर समितीच्या मुख्य सचिवांच्या आकस्मिक निधनाबद्दल शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून मान्यवरांनीही शोक व्यक्त केला आहे. निवृत्त प्राध्यापक रणंजय सिंह हे मारुती मानस मंदिराच्या स्थापनेच्या सुरुवातीपासून ते कार्यरत होते. मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमात उपस्थित समितीच्या सदस्यांनी ही सविस्तर माहिती माध्यमांना दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सायंकाळी स्वामी रत्नेश्वरजींचे प्रवचन संपल्यानंतर प्राध्यापक सिंह उपस्थित श्रोत्यांना संबोधित करत होते. त्याचवेळी बोलता बोलता अचानक त्यांचा आवाज थांबला आणि त्याचवेळी ते स्टेजवर पडले. त्यांना तातडीने छपरा सदर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"