सर्वंकष आराखड्यातून विद्यापीठाच्या विकासाला गती
By Admin | Published: January 19, 2017 01:59 AM2017-01-19T01:59:18+5:302017-01-19T01:59:18+5:30
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठातून नवीन ज्ञानप्राप्ती
सुधींद्र कुलकर्णी यांचा आशावाद : गोंडवाना विद्यापीठात भविष्यातील दिशा व आराखड्यावर विचारमंथन
गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठातून नवीन ज्ञानप्राप्ती होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. याकरिता सर्वंकष आराखडा आवश्यक आहे. राज्य शासनाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडे सर्वंकष आराखडा सादर करणार, या आराखड्यातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडेल, असा आशावाद आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशन मुंबईचे चेअरमन सुधिंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
‘गोंडवाना विद्यापीठाची भविष्याची दिशा, आराखडा व रूपरेषा संदर्भात शैक्षणिक समुदायास आवाहन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून गिरीश प्रभूणे, प्रा. राजेश राकडे, विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सुधिंद्र कुलकर्णी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचा विकास आराखडा बनवून तो राज्यपाल व महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे काम आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशनला मिळाले आहे. फाऊंडेशनने आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत रिसर्च करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व विकासासाठी विशिष्ट आराखडा शासनाला सादर केला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती आली. आयटीआयबाबतही सर्वेक्षण करण्यात आले असून यासंदर्भातील अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे, इच्छाशक्ती व दृष्टी ठेवली तर गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ जगातील श्रेष्ठ विद्यापीठाच्या यादीत नक्कीच समाविष्ट होईल, असे ते म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी चांगले कॅम्पस्, इमारत, भौतिक सुविधांची गरज आहे. तसेच विविध प्रकारचे कोर्सेस शाखा, तसेच विद्यार्थीही असणे महत्त्वाचे आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीत परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. याकरिता गोंडवाना विद्यापीठ प्रशासन, महाविद्यालय चालविणारे संस्थापक, प्राचार्य, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेते, या सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. सर्वंकष आराखड्यातून सर्वांच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठाचे नवीन भविष्य घडवू या, असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले.
याप्रसंगी गिरीश प्रभूणे म्हणाले, पूर्वीच्या काळात भारतात तक्षशीला, नालंदा अशी अनेक जागतिक स्तरावर ओळख निर्माण झालेली विद्यापीठे स्वयंपूर्ण होती. पूर्वीच्या काळात शिक्षण ही कुणाचीही मक्तेदारी नव्हती. भारतात व महाराष्ट्रात ज्ञान व औद्योगिक समृद्धी होती. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आता गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती व रोजगार निर्मिती घडविण्याची गरज आहे, असे प्रभूणे यावेळी म्हणाले. कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले, गोंडवाना विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी स्थानिकस्तरावरच नव्हे तर राज्यस्तरावर स्पर्धेत टिकले पाहिजे, त्यांनी मोठमोठ्या नोकऱ्या मिळविल्या पाहिजेत, यासाठी ज्ञानदानाची केंद्र विस्तारित होणे गरजेचे आहे. या विद्यापीठातून शिकलेले विद्यार्थी सर्वांगिणदृष्ट्या सक्षम आवश्यक आहे. तेव्हाच गोंडवाना विद्यापीठाचे खरी फलीत साध्य होईल, असेही डॉ. कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.
संचालन विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रोकडे यांनी केले. या चर्चासत्राला विद्यापीठाचे कुलसचिव दीपक जुनघरे, व्यवस्थापन समितीचे सदस्य समीर केने, नीलेश बने, भटाचार्य यांच्यासह विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)