संभाव्य मुख्यमंत्र्यांचे प्रोजेक्शन असे बारगळले..!
By admin | Published: July 17, 2014 12:42 AM2014-07-17T00:42:16+5:302014-07-17T00:42:16+5:30
मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, मग दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवू असा चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपाच्या कोअर समितीसह प्रमुख पदाधिकाऱ्याशी मंगळवारी शहा यांनी राज्याच्या स्थितीबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री पदाचे नाव तुर्तास बारगळल्याने, जागा वाढविण्यासाठी हमखास विजयी होऊ शकणाऱ्या भाजपाच्या काही आमदारांना तयार राहण्याचे संकेत शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात वातावरण मोदीमय असल्याने भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर पक्ष सत्तेत येऊ शकेल, ही प्रमुख शक्यता पडताळून पाहायची का, असे शहा यांना सांगण्यात आले. असे झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून लाभ घेता येईल, असेही त्यांना आडून सुचविले गेले. मात्र सत्तेत यायचे असेल तर या शक्यतांवर विचार करू नका, अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांचे आमदार अधिक असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल असे आधीच ठरल्याचे शहा यांनी सांगितले. त्यामुळे वाटाघाटीत जागा शिवसेनेच्या पदरात अधिक गेल्या तरी, विजयी किती होतील, यावरच मुख्यमंत्रीपदाचे नाव अवलंबून आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ जागा लढविल्या, पैकी ४७ जिंकल्या. शिवसेनेने १६० जागा लढविल्या, पैकी ४५ जिंकल्या. यावेळी भाजपा १२५-१३० जागा मागणार आहे. तर शिवसेनेला १६० जागांवरून १४५ जागांपर्यंत मागे आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. १७ ते २० जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठेवली जात आहे. पण शिवसेना जागा सोडेल का, याप्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेच नाही.
प्रमोद महाजन असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेने बळकावला, तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बोलणी सुरू असताना गुहागर विधानसभा मतदारसंघ ओढून घेतला, त्यामुळे वाटाघाटीच्या यावेळच्या चर्चेत जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा नेते शिवसेनेवर उलटणारे अनेक मुद्दे भात्यात भरून नेणार आहेत. शहा यांना सांगण्यात आले, की शिवसेनाकडे ओढा असलेल्या रामदास आठवले यांना राज्यसभा बहाल करताना भाजपाने मदत केली, त्यामुळे राजू शेट्टी यांना भाजपा, तर आठवले व जानकर या मित्रांना शिवसेनेने आपल्या वाट्याच्या जागा द्याव्या, दोन्ही पक्ष ज्या जागा कधीच जिंकू शकले नाहीत, त्या जागांवर यावेळी भाजपाने दावा करावा. त्यामुळे जागांच्या वाटाघाटीत शिवसेना पुढे राहणार असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त विजयी करण्याचे धोरण असणार आहे.
————