गुजरात नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा! शहांच्या शिष्टाईनंतर उपमुख्यमंत्री खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:35 AM2018-01-01T02:35:22+5:302018-01-01T02:35:48+5:30
नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सन्मान्य खाते न दिल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिष्ठाई करून पटेल यांना पुन्हा वित्त खाते द्यायला लावले.
अहमदाबाद : नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सन्मान्य खाते न दिल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिष्ठाई करून पटेल यांना पुन्हा वित्त खाते द्यायला लावले. परिणामी गुजरातच्या भाजपा सरकारमध्ये गेले चार दिवस सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर रविवारी पडदा पडला.
अमित शहा यांनी सकाळी फोन करून माझ्या योग्यतेला व उपमुख्यमंत्र्याच्या दर्जाला साजेसे खाते देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असे पटेल यांनी पदभार स्वीकारायला जाण्याआधी निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. हा एखादे विशिष्ट खाते मिळण्याचा प्रश्न नाही तर माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, असे सांगून पटेल म्हणाले की, एक तर मला माझ्या इभ्रतीनुसार खाते द्या, नाही तर मला मंत्रिमंडळातून बाहेर पडू द्या, असे मी पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले होते.
पटेल हे उपमुख्यमंत्री असल्याने वित्त खाते नसले तरी मंत्रिमंडळात त्यांचे स्थान दुसºया क्रमांकाचेच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी नाराज होण्याचे काही कारण नाही, असे सांगणाºया मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची रविवारी भाषा बदलली. पटेल मेहसाणाला रवाना होताच रुपाणी यांनी वित्त खाते त्यांना देण्यात आल्याचे गांधीनगरमध्ये जाहीर केले. ‘नितीनभाईंना वित्त मंत्रालय देण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद आता संपला आहे. भाजपासारख्या मोठ्या पक्षात अशा छोट्या कुरबुरी होतच असतात. खातेबदल करण्याचे पत्र मी राज्यपालांना पाठविले आहे, असे रुपाणी म्हणाले.
पटेल यांच्या नाराजीची संधी साधत त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी केला होता. नितीन पटेल १० आमदारांसह भाजपा सोडून येणार असतील तर, काँग्रेसशी बोलून त्यांना सन्मानाचे पद दिले जाईल, अशी आॅफर हार्दिक पटेल यांनी दिली
होती. (वृत्तसंस्था)