कन्हैया कुमारवरील शिस्तभंग कारवाईला स्थगिती
By Admin | Published: May 14, 2016 02:26 AM2016-05-14T02:26:30+5:302016-05-14T02:26:30+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य काही जणांवर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य काही जणांवर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या सर्वांना न्यायालयाने दिलेला हा मोठाच दिलासा आहे.
तत्पूर्वी, न्यायालयाने बेमुदत उपोषणावर बसलेल्या या विद्यार्थ्यांना आपले आंदोलन तात्काळ मागे घेण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांविरुद्धच्या कारवाईला सशर्त स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते विद्यापीठात चालू केलेले बेमुदत उपोषण त्वरित थांबवतील आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात कोणतेही आंदोलन करणार नाहीत. कन्हैया कुमार आणि या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला दिल्ली उच्य न्यायालयात आव्हान दिले होते.
या विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या अपिलीय प्राधिकरणाकडे कारवाईविरुद्ध दाद मागितली आहे. त्यावर या प्राधिकरणाने निर्णय घेईपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांनी एक शपथपत्र दाखल करून आपण बेमुदत उपोषण मागे घेत आहोत आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.