नवरदेवाला दाढी राखण्यास अन् घोड्यावरून वरात काढण्यास मनाई, विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी अनोखे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:27 AM2022-06-28T11:27:31+5:302022-06-28T11:28:17+5:30
विवाहामध्ये अमुक रकमेच्याच वस्तू भेटीदाखल द्याव्यात, असे बंधनही वऱ्हाडी मंडळींवर घालण्यात आले आहे. १९ गावांतील कुमावत समुदायाच्या लोकांनी १६ जूनला एक बैठक घेऊन विवाहाचा खर्च कमी करण्याचे नियम तयार केले.
जयपूर : विवाहावर होणारा अफाट खर्च टाळण्यासाठी राजस्थानमधील पाली जिल्ह्यात कुमावत व जाट समुदायाने काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार, नवऱ्या मुलाची घोड्यावरून वरात काढण्यात येणार नाही, तसेच नवरदेव दाढी ठेवणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.
विवाहामध्ये अमुक रकमेच्याच वस्तू भेटीदाखल द्याव्यात, असे बंधनही वऱ्हाडी मंडळींवर घालण्यात आले आहे. १९ गावांतील कुमावत समुदायाच्या लोकांनी १६ जूनला एक बैठक घेऊन विवाहाचा खर्च कमी करण्याचे नियम तयार केले.
सध्या नवरदेव चित्रविचित्र आकाराची दाढी ठेवतात. त्यामुळे या सोहळ्यातले गांभीर्य कमी होते, यावर कुमावत समाजाच्या नेत्यांचे मत झाले. त्यामुळे लग्नप्रसंगी नवऱ्याने दाढीच ठेवू नये, असा नियम या बैठकीत करण्यात आला.
श्रीमंती सजावटीला मज्जाव
कुमावत समाजाचे नेते लक्ष्मीनारायण टाक यांनी सांगितले की, लग्नामध्ये सजावट, संगीत व अन्य प्रथांवर होणारा प्रचंड खर्च कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोणत्याही विवाहात खूप मोठी सजावट असणार नाही. कोणीही डीजे लावणार नाही. वधुवराला पोशाख किंवा दागिने विशिष्ट रकमेपर्यंतच द्यावे, असे बंधन घालण्यात आले.
नियम न पाळल्यास दंड
विवाहावरील प्रचंड खर्चाला कात्री लावणार. नियम न पाळणाऱ्यांना दंड आकारण्याचे किंवा अन्य प्रकारची शिक्षा सुनावण्याचा निर्णय बैठकांमध्ये घेण्यात आला.
डीजे, फटाके टाळणार
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील पाच गावातल्या जाट समुदायानेही विवाहांवर कमी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नवऱ्यामुलाची घोड्यावरून वरात न काढण्याचे ठरविण्यात आले आहे. भाकरीवाला गावचे सरपंच आमनाराम बेनीवाल यांनी सांगितले की, नवऱ्या मुलाने दाढी करूनच लग्नमंडपात यावे, फटाके वाजवू नयेत, डीजे असू नये, असे नियम आम्ही तयार केले आहेत. विवाहामध्ये होणारा प्रचंड खर्च गरीब लोकांना परवडत नाही.