लक्षावधी लोकांना इंटरनेट जोडणीसाठी प्रोजेक्ट लून...

By admin | Published: December 17, 2015 12:37 AM2015-12-17T00:37:22+5:302015-12-17T00:37:22+5:30

लक्षावधी लोकांना परवडणाऱ्या खर्चामध्ये इंटरनेट उपलब्ध करून देईल असा ‘प्रोजेक्ट लून’ भारतात आणण्याची आशा गुगल कंपनीला आहे. मात्र या प्रकल्पामुळे देशातील

Project Loans for Internet Connectivity to Millions of People ... | लक्षावधी लोकांना इंटरनेट जोडणीसाठी प्रोजेक्ट लून...

लक्षावधी लोकांना इंटरनेट जोडणीसाठी प्रोजेक्ट लून...

Next

नवी दिल्ली : लक्षावधी लोकांना परवडणाऱ्या खर्चामध्ये इंटरनेट उपलब्ध करून देईल असा ‘प्रोजेक्ट लून’ भारतात आणण्याची आशा गुगल कंपनीला आहे. मात्र या प्रकल्पामुळे देशातील मोबाईल कंपन्यांच्या सेल्युलर ट्रान्समिशनमध्ये हस्तक्षेप होईल असे सरकारचे मत आहे.
‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमात येथे बुधवारी बोलताना गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई म्हणाले की, प्रोजेक्ट लून अंतर्गत ग्रामीण भागात इंटरनेट जोडणी पोहोचण्यासाठी आकाशात बलून्स (फुगे) सोडले जातील.’’
या प्रकल्पाचा तपशील सांगताना गुगलच्या उपाध्यक्षा (अ‍ॅक्सेस स्ट्रॅटेजी अँड इमर्जिंग मार्केटस्) मरिअन क्रोक म्हणाल्या की, ‘जगभरच इंटरनेटची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कंपनीची तीव्र इच्छा आहे. आमच्याकडे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यातील प्रोजेक्ट लून हे एक आहे.
संपूर्ण जगात आम्ही स्थानिक दूरसंचार कंपन्यांसोबत या प्रकल्पाचे काम करीत आहोत.’ आम्ही अति उंचावर जाणाऱ्या बलुन्सची चाचणी घेत आहोत. हे बलुन्स शब्दश: तरंगत्या मनोऱ्यासारखेच काम करणार आहेत.
ज्या भागात खूप कमी लोकसंख्या आहे आणि जेथे इंटरनेट पोहोचणे खूप कठीण काम आहे अशा ठिकाणी या तरंगत्या मनोऱ्याद्वारे इंटरनेट पोहोचू शकेल अशी आशा आहे. भारतात ज्या ग्रामीण भागात इंटरनेट खूप कमी प्रमाणात पोहोचले आहे तेथे ते प्रोजेक्ट लूनद्वारे देण्यात आम्हाला यश येईल अशी आशा आहे.’ माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नुकतेच संसदेत असे सांगितले होते की, गुगलचा हा लून प्रकल्प भारतातील मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या ट्रान्समिशनमध्ये हस्तक्षेप करील. गुगलच्या प्रोजेक्ट लूनसाठी जी नियोजित फ्रिक्वेन्सी बँड वापरली जाणार आहे ती भारतातील सेल्युलर आॅपरेशन्ससाठी वापरली जाते व त्यामुळे सेल्युलर ट्रान्समिशनमध्ये हस्तक्षेप होईल, असे प्रसाद यांनी ११ डिसेंबर रोजी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले होते. मरियन क्रोक म्हणाल्या की, ‘कंपनी संपूर्ण जगात स्थानिक दूरसंचार कंपन्या, आॅपरेटर्स आणि सप्लायर्सच्या मदतीने प्रकल्प राबवते. स्वत:हून नाही. अब्जावधी लोकांना इंटरनेटशी जोडायचे तेही परवडणाऱ्या खर्चात व मुबलक प्रमाणात या महाप्रचंड कामाचे स्वरूप बघता कोणत्याही एका कंपनीकडून एकट्याने ते होऊ शकत नाही.’ या पार्श्वभूमीवर मी नेहमी माझ्या तुकडीला सांगते की, आपण कोणाचे स्पर्धक आहोत असा विचार करू नका, तर त्या कामासाठी आपल्याला भागीदार आहेत असा विचार करा.
प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे, असे क्रोक म्हणाल्या. गुगलच्या या मोहिमेचा गाभा हा जगभर इंटरनेट उपलब्ध व्हावे असा असून आमचे प्रयत्न हे त्या दिशेने सुरू आहेत. त्यामुळे जगात प्रत्येकाला संपूर्ण इंटरनेट परवडणाऱ्या दरात व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पाअंतर्गत गुगल मोठे बलुन्स ट्रान्समिशन व इंटरनेट सेवा देण्यासाठी पृथ्वीपासून २० किलोमीटर उंचीवर तरंगते ठेवणार आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी गुगलने याआधीच न्यूझीलंड, कॅलिफोर्निया (अमेरिका) आणि ब्राझीलमध्ये केली आहे. उत्तम तंत्रज्ञान आणि सद््भावनेची दृष्टी असली तरी मंत्री प्रसाद यांच्या विधानानंतर (हस्तक्षेप होईल अशी भीती) भारतीय परिस्थितीत त्याची चाचणी घेणे गरजेचे आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बलून जमिनीवर ४० किलोमीटर परिघात वायरलेस कम्युनिकेशन्स तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट जोडणी देईल. या तंत्रज्ञानाला एलटीई किंवा फोरजी म्हणतात. एलटीई किंवा फोरजीचा वापर करण्यासाठी प्रोजेक्ट लूनचे भागीदार दूरसंचार कंपन्यांशी सेल्युलर स्पेक्ट्रम एकत्रित वापरतील.
त्यामुळे लोकांना कुठेही इंटरनेट जोडणी थेटपणे त्यांच्या फोनवर किंवा एलटीई तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या साधनावर (गॅजेट) उपलब्ध होईल. बलूनमधील उपकरणांना दिवसभर ऊर्जा देण्यासाठी गुगल कंपनी सौर पॅनेल किंवा पवन ऊर्जा वापरते.

गुगल सीईओ सुंदर पिचार्इंची पहिली भारत भेट
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पद स्वीकारल्यानंतर बुधवारी प्रथमच भारत दौरा केला. गुगल, यू ट्यूबचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या समवेत असून त्यांनी भारतातील योजनांची आज घोषणा केली. त्यातील काही महत्त्वाच्या योजना अशा :

नोकरीची संधी - गुगल बंगळुरू व हैदराबादेत नोकरीच्या संधी निर्माण करणार आहे.
हैदराबादेत नवा कॅम्पस- क्षमतेत वाढ करण्यासाठी हैदराबादेत नवीन परिसर विकसित करणार आहे.
वीस लक्ष सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना प्रशिक्षण- राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेसोबत भागीदारी करून देशभरातील २० लाख डेव्हलपर्स प्रशिक्षित केले जातील.
‘महिलांसाठी सायकल’ प्रकल्प देशभरात- महिलांना आॅनलाईन सुविधा मिळावी यासाठी गुगल प्रयत्न करील. ‘महिलांसाठी बायसिकल’ प्रकल्प देशभर राबविला जाईल. येत्या ३ वर्षात ३ लाख महिलांना आॅनलाईन सुविधा पुरविली जाईल.
सर्वांसाठी इंटरनेट - सर्वांसाठी इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल नेटवर भर दिला जाणार आहे. गुगलचा ग्रामीण इंटरनेट प्रकल्प ३ लाख गावांमध्ये सुरू केला जाणार आहे.

१०० रेल्वे स्टेशन्स बनणार वायफाययुक्त
भारतात पुढील वर्षापर्यंत १०० रेल्वे स्थानकांवर इंटरनेट संपर्क अधिक सोपा करण्यासाठी वाय-फायची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी बुधवारी येथे सांगितले.
भारतात सगळ्यांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी गुगल कंपनी प्रयत्न करीत आहे व १०० रेल्वे स्टेशन्सवर ही सोय उपलब्ध करून देणे हा याच प्रयत्नांचा भाग आहे.
‘डिसेंबर २०१६ पर्यंत भारतातील १०० रेल्वे स्टेशन्सवर वायफायची सोय असेल. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर ही सोय येत्या जानेवारीमध्ये सुरू होईल. भारतीय रेल्वेची दूरसंचार संस्था रेलटेलने गुगल इंडियाच्या सहयोगी संस्थेशी केलेल्या करारानुसार देशभर ४०० रेल्वे स्टेशन्सवर वाय-फायची सोय उपलब्ध केली जाईल.’

Web Title: Project Loans for Internet Connectivity to Millions of People ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.