अमेठी, रायबरेलीतील प्रकल्प बंद पाडले जातात
By admin | Published: August 5, 2016 04:23 AM2016-08-05T04:23:14+5:302016-08-05T04:23:14+5:30
लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला
नवी दिल्ली : सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील केंद्राचे प्रकल्प बंद करून सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने गुरूवारी राज्यसभेत केला. तथापि, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हा आरोप फेटाळून लावला.
काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात विजय मिळविला होता. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे तर उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
शुन्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे प्रमोद तिवारी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने या मतदारसंघांतील प्रकल्पांवर वरवंटा फिरविला जात आहे. यापूर्वी जगदीशपुर येथील हिंदुस्तान पेपर मील आणि डिस्कव्हरी पार्कला टाळे ठोकण्यात आले होते तसेच फुड पार्क प्रकल्पही रोखण्यात आला होता. आता राजीव गांधी इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ इन्फॉर्मेशनची अमेठीतील शाखा बंद करण्यात आली आहे. राजकारणाचा हा किळसवाणा प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील प्रकल्प बंद करून तुम्ही त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचा सूड घेत आहात, असे तिवारी म्हणाले.
काँग्रेसमुक्त भारताची भाषा करणारा भाजप आता जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या संस्थाही बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तुम्ही कितीही प्रयत्न करा. मात्र, इतिहासातील त्यांच्या त्यागाचे संदर्भ तुम्ही वगळू शकणार नाहीत. इतिहास जेव्हा वाचला जाईल तेव्हा तुम्ही खलनायक म्हणूनच लोकांच्या समोर याल,असेही ते म्हणाले. तिवारी यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसचे राजीव शुक्ला म्हणाले की, हे सरकार सुडाच्या भुमिकेतून काम करीत असल्याचे दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>कोणीही सूडभावना ठेवू नये...
विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या संख्येने प्रकल्प बंद करण्यात आले असतील तर असे का हा विचार आमच्या मनात डोकावणारच. सरकारला टोला लगावताना आझाद यांनी ‘चेटकीनीही काही घरे सोडतात’ ही म्हण उद्धृत केली. दोन पक्षांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, कोणीही सूडभावना ठेवू नये, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले की, कोणाचाही सूड घेण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो. फुड पार्क प्रकल्प संपुआ सरकारच्यात काळात बंद करण्यात आला. इतर प्रकल्पांचे मुद्दे मी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना त्याची कारणे आणि पार्श्वभुमि विचारेन, असे ते म्हणाले.