डोअर बेल खराब झाली, मोदी मोदी ओरडा; हा आहे प्रचाराचा पुणेरी पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:10 PM2019-04-12T17:10:57+5:302019-04-12T17:12:22+5:30
रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे
ग्वालियर - आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील लोकांमध्ये तसेच राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उमेदवार असो वा राजकीय नेते लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कोणतीची कमतरता बाळगत नाही. कोणतीही भन्नाट पाटी किंवा पोस्टर्स बघितल्यानंतर साहजिकच आपल्या डोळ्यासमोर पुणेरी पॅटर्न आठवतो. याच धर्तीवर मध्य प्रदेशातील ग्वालियर भागात भाजपाच्या समर्थकांकडून पुणेरी पद्धतीने हटके प्रचार करण्यात येतोय. मुरैना जिल्ह्यामधील गावांमध्ये लोकांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर्स लोकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपा समर्थकांनी हे पोस्टर्स लोकांच्या घराबाहेर लावण्यात आले आहेत.
रामनगर क्षेत्रातील भाजपाच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. अशा प्रकारचे पोस्टर रामनगरमधील एक डझनहून अधिक घरांच्या बाहेर चिकटवण्यात आले आहे. ज्या घरांच्या बाहेर असे पोस्टर लावण्यात आले आहेत त्यातील एका घराचा मालक गिर्राज शर्मा यांनी सांगितले की, आमच्या घराची डोअर बेल खराब झाली होती. त्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने अशा प्रकारचा मजकूर लिहून हे पोस्टर मी घराबाहेर लावलं. मात्र त्यानंतर हळूहळू या पोस्टरचं लोणं संपूर्ण रामनगर परिसरात पसरत गेलं. सध्या हे पोस्टर सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलं आहे.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून आणि कार्यकर्त्यांकडून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध शक्कल लढवल्या जातात. टीशर्ट, झेंडे, टोपी या प्रचार साहित्यासह अनेक माध्यमातून लोकांनी आपल्याच पक्षाला मतदान करावं यासाठी आवाहन केलं जातं. मात्र अशा भन्नाट कल्पनांनी निवडणुकीच्या वातावरणात हास्याचे रंग मात्र भरले जातात. देशात लोकसभा निवडणुका लागू झाल्यानंतर गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. 91 लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान पार पडले असून आणखी 6 टप्प्यातील मतदान बाकी आहे. मध्यप्रदेशमध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मात्र भाजपा समर्थकांकडून प्रचाराची वापरण्यात आलेली ही अनोखी शक्कल किती फायदेशीर ठरणार हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेलच.