प्रचाराची पातळी घसरली
By admin | Published: February 21, 2017 01:35 AM2017-02-21T01:35:30+5:302017-02-21T01:35:30+5:30
उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या
लखनौ : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आता वैयक्तिक पातळीवर टीका सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप व टीका करताना गाठलेली ही पातळी उत्तर प्रदेशच्या मतदारांनाही भावलेली नाही.
ही तर बहेनजी संपत्ती पार्टी : नरेंद्र मोदी
जालौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बसप नेत्या मायावती यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला केलेल्या विरोधाची खिल्ली उडवून बसप आता ‘बहेनजी संपत्ती पार्टी’ झाला आहे, असा टेला लगावला. प्रचार सभेत ते म्हणाले की, जे लोक स्वत:साठी संपत्ती गोळा करतात ते कधीही लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्याबद्दल मोदी यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यावरही टीका केली. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला मी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर मात्र एकत्र आले.
मोदी म्हणजे ‘निगेटिव्ह
दलित मॅन’ : मायावती
सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना ते ‘श्री. निगेटिव्ह दलित मॅन’ (दलितविरोधी नेते) आहेत, असे येथे म्हटले. त्या म्हणाल्या ‘‘बसपच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पंतप्रधान अस्वस्थ झाले आहेत म्हणूनच ते सर्वोच्च नेत्याबद्दल हलक्या गोष्टी बोलतात.’’ शब्दांचा वापर करण्यात मोदी कुशल असले तरी जेव्हा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळते त्यावेळी ते सगळे विसरतात. आज मला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला भाग पडले, असेही त्या म्हणाल्या.
गाढवांची जाहिरात
करू नये : अखिलेश
रायबरेली : ‘गुजरातच्या गाढवांसाठी जाहिरात करू नका’ असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांना दिला. बच्चन हे गुजरातचे पर्यटन सदिच्छा दूत आहेत. राज्याच्या कच्छमधील जंगली गाढव अभयारण्याला पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून ते जाहिरातीत शिफारस करतात. बच्चन यांचे नाव न घेता यादव म्हणाले की,‘एक गधे का विग्यापन आता है. मैं इस सदी के सबसे बडे महानायक से कहुँगा के अब आप गुजरात के गधों का प्रचार मत करीए.’ गाढवांचीही जाहिरात होत असेल तर काय होईल, असा प्रश्न यादव यांनी उपस्थितांना विचारला.