महाराष्ट्रातील दोन अधिकाऱ्यांसह १६ आयएएस अधिकाऱ्यांना पदाेन्नती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:02 AM2023-09-18T06:02:58+5:302023-09-18T06:03:27+5:30
महाराष्ट्र केडरच्या १९९८ च्या बॅचचे दोन आयएएस अधिकारी राजीव कुमार मित्तल आणि सौरभ विजय यांना केंद्रात अतिरिक्त सचिव पदावर बढती देण्यात आली आहे
मनोज टिबडेवाल आकाश
नवी दिल्ली - भारत सरकारच्या नियुक्ती प्रकरणातील समितीने देशातील १६ आयएएस अधिकाऱ्यांची केंद्रामध्ये अतिरिक्त सचिव आणि अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदांसाठी बढती केली आहे हे सर्व अधिकारी सहसचिव दर्जाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते, आता त्यांना बढती देऊन अतिरिक्त सचिव करण्यात आले आहे. यातील प्रत्येकी एक आयएएस १९८७, १९९६ व १९९७ बॅचमधील तर उर्वरित १३ अधिकारी १९९८ च्या बॅचमधील आहेत.
महाराष्ट्र केडरच्या १९९८ च्या बॅचचे दोन आयएएस अधिकारी राजीव कुमार मित्तल आणि सौरभ विजय यांना केंद्रात अतिरिक्त सचिव पदावर बढती देण्यात आली आहे. १९८७ च्या बॅचमधील पश्चिम बंगाल केडरचे आयएएस आणि सध्या उपराष्ट्रपती धनखड यांचे सचिव सुनील कुमार गुप्ता यांची पदोन्नती दीर्घकाळापासून प्रलंबित होती. त्यांची सेवानिवृत्ती या वर्षी ३१ डिसेंबर रोजी आहे. आता त्यांची अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदासाठी बढती देण्यात आली आहे.
यांनाही मिळाली बढती : १९९६ बॅचच्या यूपी केडरच्या अनिता मेश्राम आणि १९९७ बॅचच्या तामिळनाडू केडरचे पंकजकुमार बन्सल यांनाही बढती मिळाली आहे. याशिवाय १९९८ च्या बॅचचे ज्ञानेंद्र डी त्रिपाठी, श्रीकांत नागुलापल्ली, रित्विक रंजनाम पांडेय, निकुंज कुमार श्रीवास्तव, विशाल चौहान, आनंदराव विष्णू पाटील, पुनीत अग्रवाल, ज्ञानेश भारती, संतोष दत्तात्रेय वैद्य, वंदना यादव यांना अतिरिक्त सचिवपदी बढती करण्यात आली आहे. विशाल गगन यांना अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदावर बढती देण्यात आली आहे.