शैक्षणिक धोरणामध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन
By admin | Published: June 19, 2016 04:53 AM2016-06-19T04:53:29+5:302016-06-19T04:53:29+5:30
केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात येत असलेल्या नव्या धोरणात शाळांमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात येत असलेल्या नव्या धोरणात शाळांमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव सुभाषचंद्र खुंटिया यांनी शनिवारी पहिल्या योग आॅलिम्पियाडच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती दिली. या आॅलिम्पियाडमध्ये २२ राज्यांमधील ३५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये या प्राचीन विद्येचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी परिसरात या तीन दिवसीय समारंभाचे आयोजन करण्यात आले.
खुंटिया म्हणाले, ‘नव्या धोरणात योगाभ्यासाला महत्त्व असणार आहे. योग म्हणजे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासोबतच सुदृढ आरोग्य देणारी कला आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय झाला असून, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी योगाभ्यासाचे धडे मिळावेत, म्हणून दरवर्षी हे आॅलिम्पियाड भरविण्यात येणार आहे.’
एनसीईआरटीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यासाची पुस्तके प्रकाशित केली असून, इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत केंद्रीय अभ्यासक्रमाचा तो भाग राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. खुंटिया म्हणाले, ‘मोठ्या शाळांमध्ये प्रशिक्षित योग शिक्षक आहेत, परंतु ज्या शाळांमध्ये ते उपलब्ध नाहीत, तेथील शारीरिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांना योगाभ्यास संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जात आहे.’ ‘योगाभ्यासाने एक चांगला माणूस आणि नागरिक निर्माण करण्यास मदत होऊ शकते,’ असे मत राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक ऋषिकेश सेनापती यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)