आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करा!
By admin | Published: December 8, 2015 11:22 PM2015-12-08T23:22:32+5:302015-12-08T23:22:32+5:30
आपल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा सन्मान केला तेवढा सन्मान याआधीच्या कोणत्याही सरकारने केलेला नाही
नवी दिल्ली : आपल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा सन्मान केला तेवढा सन्मान याआधीच्या कोणत्याही सरकारने केलेला नाही, असा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची दृष्टी आणि विचारांचा जनमानसात प्रसार-प्रचार करण्याचे आवाहन भाजपच्या खासदारांना मंगळवारी केले.
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मोदी बोलत होते. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा येणारा वाढदिवस आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीबाबत बोलताना, मोदी यांनी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणकारी कार्यक्रम आणि प्रकल्पांचा शुभारंभ करण्याचे आवाहन खासदारांना केले. २५ डिसेंबरला वाजपेयींचा वाढदिवस आहे.
मोदी म्हणाले, ‘माझ्या सरकारने डॉ. आंबेडकरांना मोठा सन्मान दिलेला आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्याची घोषणा आणि बाबासाहेबांच्या सन्मानार्थ विशेष नाणी जारी करण्यासह केंद्र सरकारने बाबासाहेबांशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.’
आपल्या सरकारने बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रीय दृष्टीसह त्यांचे अनेक पैलू जगासमोर आणले आहेत. विविध मंत्रालयांनी त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे साहित्य प्रकाशित केले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)