अयोध्या वादावर ६ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:33 AM2017-11-08T04:33:02+5:302017-11-08T04:33:14+5:30
अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे
लखनौ : अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद शांततेने सोडविण्यासाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार केलेला असेल, असे उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डने मंगळवारी म्हटले आहे. बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले, यांनी आपण संत व महंतांना भेटण्यासाठी अयोध्येला भेट देणार आहोत. राम मंदिर त्या वादग्रस्त जागी उभारावे, असे मत रिझवी यांनी व्यक्त केलेले होते.
अयोध्येचा वाद शांततेने आपापसात मिटावा, यासाठी मसुदा प्रस्तावावर मी आधीच त्यातील अनेकांशी आणि काही याचिकांकर्त्यांशी अटी आणि शर्तींबद्दल चर्चा केलेली आहे. आपापसातील सहमतीसाठी येत्या ६ डिसेंबरपर्यंत आम्ही मसुदा प्रस्ताव तयार करू शकू, अशी आशा आहे, असे रिझवी म्हणाले. रिझवी यांनी गेल्या महिन्यात श्री श्री रविशंकर यांची बंगळुरूत भेट घेऊन राम मंदिराच्या जागेबद्दल वक्फ बोर्डची भूमिका सांगितली. वादग्रस्त जागी मशीद बांधली जाऊ नये, त्याऐवजी मुस्लीम लोकसंख्येच्या इतर ठिकाणी ती बांधावी, असे बोर्डला वाटते.
अर्थात, त्या वादग्रस्त जागेशी शिया मुस्लिमांचा काडीमात्र संबंध नाही. ते ती जागा मंदिरासाठी देण्यास तयार कसे होतात, असे सुन्नी मुस्लिमांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिया वक्फ बोर्डाने काही म्हटले, तरी हा वाद सहजासहजी मिटण्याची शक्यता नाही.
मी सरकारी हस्तक नाही-श्री श्री रविशंकर
चंदीगड : अयोध्येतील रामजन्मभूमी वादातील मध्यस्थीत ‘सरकारचे हस्तक’ असल्याचा काँग्रेसने केलेला आरोप अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी फेटाळला. मी नेहमीच स्वत: काम केले आहे. मी कोणाच्याही सांगण्यावरून काम करीत नाही, असे ते सोमवारी वार्ताहरांशी येथे बोलताना म्हणाले. अयोध्या प्रश्नावर तुमची भूमिका काय, असे विचारले असता ते म्हणाले, मी जर एखादी भूमिका घेतली, तर मी मध्यस्थी कशी करू शकेन? संवाद साधून सर्व संबंधितांना एकत्र आणून तोडगा शोधता येईल का? याकडे मी बघेन. सरकारच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व रविशंकर करीत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी म्हटले होते. रामजन्मभूमीचा वाद न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी मध्यस्थीची तयारी रविशंकर यांनी दाखविल्याचे वृत्त होते.