तीन वर्षांत घरोघरी येणार विजेचे प्रीपेड मीटर, केंद्र सरकारचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:06 AM2018-06-09T00:06:11+5:302018-06-09T00:06:11+5:30
येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल.
नवी दिल्ली : येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल. त्यामुळे वीजबिलांची थकबाकी हा विषय इतिहासजमा होईल.
विजेच्या मीटरच्या उत्पादकांची एक बैठक केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केली होती. त्यात ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आर. के. सिंग म्हणाले की, येत्या तीन वर्षांत विजेचे मीटरिंग म्हणजेच वीजवापराची जोडणी व शुल्कआकारणी स्मार्ट व प्रीपेड
होणार आहे.
त्यामुळे विजेचे बिल ग्राहकाच्या घरी पाठविणे इतिहासजमा होईल. अशा स्मार्ट प्रीपेड वीज
मीटरचे उत्पादन वाढविणे व त्यांच्या किंमती कमी करणे ही काळाची
गरज आहे.
आगामी काळात अशा मीटरची मागणी वाढणार असल्याने उत्पादकांनी तेवढी मीटर बनविण्याची तयारी करावी, असा सल्ला मंत्र्यांनी दिला. भविष्यातील एका ठराविक दिवसापासून प्रत्येक वीज जोडणीस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे सक्तीचे करण्याचा विचार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी करावी, असेही त्यांनी सुचविले.
विजेची गळती होईल कमी
अशा मीटरच्या वापरामुळे पारेषण व वितरणात होणारी विजेची गळती कमी होईल, वीज पुरवठादार कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, वीज बचतीला प्रोत्साहन मिळेल आणि कुशल युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.