भाजपा नगरसेवक शेट्टीचा तडीपारीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:25 AM2018-11-20T01:25:19+5:302018-11-20T01:25:34+5:30
पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या युवकाच्या खून प्रकरणात जामिनावर तर जुगार खेळत असताना रंगहाथ पकडल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पंचवटीतील नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या विरोधात शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
नाशिक : पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या युवकाच्या खून प्रकरणात जामिनावर तर जुगार खेळत असताना रंगहाथ पकडल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पंचवटीतील नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या विरोधात शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ गुन्हेगारांना आश्रय देणे, जुगार अड्डे चालविणे तसेच गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यात शेट्टीविरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत़ २०१५ मध्ये सराईत गुन्हेगार ज्वाल्या उगलमुगले याचा खून करण्यात आला होता़ या खून प्रकरणात भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टीसह त्याच्या गुन्हेगार साथीदारांचा समावेश असल्याचे पंचवटी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले होते़ या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शेट्टी कारागृहाबाहेर आला़ सोमवारी (दि़१२) सायंकाळी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगारावर सायंकाळी छापा टाकला़ याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहताच नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) फरार झाला होता़
पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आगामी निवडणुका व पंचवटीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेमंत शेट्टीसह ३० सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला असून, तो वरिष्ठांकडे पाठविला आहे़ दरम्यान, जुगाराच्या गुन्ह्यात न्यायालयाने शेट्टीचा जामीन अर्ज फेटाळला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़
शहरातून आणखी तीस तडीपार
भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टीबरोबरच शिवसेनेचे सुहास कांदे, इश्तियाक कोकणी, दीपक डोके यांच्याही तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्यामुळे वरिष्ठांच्या संमतीनंतर हे प्रस्ताव पाठविले जाणार असून, लवकरच ही तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली़