अमेरिकेच्या धर्तीवर कामगारांचे पगार काही काळ सुरक्षित करा -चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:19 AM2020-04-30T05:19:11+5:302020-04-30T05:19:24+5:30
कामगारांचे पगार काही महिन्यांसाठी सुरक्षित करण्याची अमेरिकेच्या धर्तीवर योजना केंद्र सरकारने तातडीने जाहीर करावी
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने वाताहात झालेल्या खासगी उद्योगांमधील १२ कोटी कामगार देशोधडीला लागू नयेत यासाठी या कामगारांचे पगार काही महिन्यांसाठी सुरक्षित करण्याची अमेरिकेच्या धर्तीवर योजना केंद्र सरकारने तातडीने जाहीर करावी, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी येथे केले.
एका व्हिडिओ पत्रकार परिषदेत चिदम्बरम म्हणाले की, या अत्यंत कठीण काळात सरकारने मदतीचे स्पष्ट धोरण जाहीर केले नाही तर खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. तसे झाले तर कोट्यवधी कामगारांची रोजीरोटी बंद होईल.
या कामगारांचे अप्रिल महिन्याचे पगार येत्या काही दिवसांत देय होणार आहेत. ते दिले जातील याची खात्री करण्यासाठी लघु, मध्यम व अन्य उद्योगांनाही आर्थिक मदत देण्याची योजना पंतप्रधानांनी तातडीने जाहीर करावी, अशी काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी असल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात त्यांनी अमेरिकेने जाहीर केलेल्या ‘पेचेक प्रोटेक्शन प्रोग्राम’चा (पीपीपी) दाखला दिला. अमेरिकेच्या संसदेने गेल्या महिन्यात ‘कोरोनाव्हायरस एड, रिलीफ अॅण्ड इकॉनॉमिक सेक्युरिटी’ (केअर्स) हा कायदा संमत केला. त्या कायद्यांतर्गत ३५० डॉलरची ‘पीपीपी’ योजना राबविण्यात येत आहे.
त्यानुसार खासगी उद्योगांना कामगारांचे पगार व अन्य आवश्यक खर्च करणे शक्य व्हावे यासाठी सरकारकडून पुढील दोन महिने ठराविक मदत दिली जाणार आहे.