लस हेच वरदान! लस घेतलेल्यांपैकी ९४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांवर अॅडमिट होण्याची वेळच आली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:37 PM2021-06-19T15:37:17+5:302021-06-19T15:37:42+5:30
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत लस हेच मोठं वरदान ठरत असल्याचं दिसून येत आहे.
कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईत लस हेच मोठं वरदान ठरत असल्याचं दिसून येत आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन आता जवळपास ६ महिने झाले आहेत आणि देशातील २७ कोटी जनतेला कोरोनाची लस देण्यात आली आहे. यात ५ कोटींहून अधिक जणांना लसीचे दोन्ही डोस देऊन झाले आहेत. यात कोरोना विरोधी लसीचे सुरुवातीचे परिणाम खूप चांगले येत असल्याचं दिसून आलं आहे.
भारताच्या कोरोना टास्क फोर्समधील प्रमुख डॉ. व्ही.के.पॉल यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी खूप मदत झाल्याचं म्हटलं आहे. लस घेतलेल्यांवर कोरोना विषाणूचा अत्यंत कमी प्रभाव झाला. ज्यांनी कोरोना विरोधी लस घेतली होती त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळच आली नाही. याशिवाय त्यांना ऑक्सिजनची देखील गर भासली नाही.
वेल्लूर स्थित एका ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या अहवालाचा दाखला देत डॉ. व्ही.के.पॉल यांनी काही आकडेवारी समोर ठेवली. या मेडिकल कॉलेजनं कोरोना विरोधी लसीच्या प्रभावाबाबत सविस्तर तपासणी केली आहे. यात एकूण ८९९१ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यात काही लोक कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले देखील होते. यात कोरोना लस ९४ टक्के सुरक्षा देत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यातच कोरोना विरोधी लस घेतलेल्यांवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात किंवा आयसीयूमध्ये दाखल होण्याची वेळच आली नाही. याशिवाय लस घेतलेल्यांवर ऑक्सिजन सपोर्टची देखील गरज भासली नाही.
"लसीकरण केल्यानंतर खूप चांगले परिणाम भारतात पाहायला मिळत आहेत. लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं परिक्षण यात करण्यात आलं. कारण तेच सर्वात धोक्याच्या परिस्थितीत काम करत आहेत. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण जरी झाली तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा धोका ७५ ते ८० टक्क्यांनी कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी केवळ ८ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची गरज भासली आहे. तसंच फक्त ६ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. म्हणजेच जवळपास ९४ टक्क्यांपर्यंत चांगले रिझल्ट आले आहेत. ही माहिती अतिशय उपयुक्त आणि खूप चांगली आहे", असं डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले.