केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र

By admin | Published: October 11, 2015 03:00 AM2015-10-11T03:00:45+5:302015-10-11T03:00:45+5:30

देशात जातीय सलोख्याची बिघडती परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या नामवंत साहित्यिकांकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.

Protest against the Center | केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र

केंद्राविरुद्ध साहित्यिकांचे निषेधास्त्र

Next

तिरुवनंतपूरम : देशात जातीय सलोख्याची बिघडती परिस्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या नामवंत साहित्यिकांकडून याचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. शनिवारी मल्याळी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी आपला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, तर मल्याळी कवी के. सच्चिदानंदन यांनी अकादमीच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन निषेध नोंदविला. या दोघांच्याही निर्णयामुळे केरळच्या साहित्य क्षेत्रात वादळ निर्माण झाले आहे.
यापूर्वी ज्येष्ठ लेखिका आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची नयनतारा सेहगल आणि प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी यांनी दादरीतील घटना आणि त्यावर पंतप्रधानांच्या मौनावर नाराजी व्यक्त करीत साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले होते. त्यानंतर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ लेखिका पद्मश्री शशी देशपांडे यांनी शुक्रवारी साहित्य अकादमीच्या सामान्य परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
सारा यांना त्यांच्या ‘आलाहाउदे पेनमक्कल : सर्वपिता ईश्वर की बेटियां’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपण लवकरच कुरियरच्या माध्यमाने पुरस्काराची रोख रक्कम आणि सन्मानपत्र अकादमीला परत पाठविणार असल्याचे त्यांनी त्रिशूर येथून वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले.
दुसरीकडे साहित्य अकादमी लेखकांच्या पाठीशी उभे राहण्यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचा ठपका ठेवत सच्चिदानंदन यांनी अकादमीच्या सर्व समित्यांमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
सच्चिदानंदन अकादमीची सर्वसामान्य परिषद, कार्यकारी मंडळ आणि वित्तीय समितीवर कार्यरत होते.
परक्कादावू यांनीसुद्धा अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. आजच्या घटनाक्रमामुळे राज्यातील साहित्य वर्तुळात मतभेद निर्माण झाले आहेत. कारण काही लेखकांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा विरोध केला असून काही त्याच्या समर्थनात उभे ठाकले आहेत. (वृत्तसंस्था)
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एम.टी. वासुदेवन नायर आणि प्रख्यात कवी सुगाताकुमारी यांनी निषेध नोंदविण्यासाठी पुरस्कार परत करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. कलबुर्गी हत्येच्या विरोधात सर्वप्रथम प्रसिद्ध हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता.

अकादमी लेखकांच्या पाठीशी नाही हे बघून आपल्याला आत्यंतिक दु:ख झाले आहे. एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्येनंतर मी अकादमीला लिहिले होते. त्यांनी बेंगळुरुत शोकसभा घेतली; परंतु राष्ट्रीय स्तरावर काहीही केले नाही. अकादमीने कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध नोंदविला पाहिजे.
- कवी के. सच्चिदानंदन

‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. जातीय सलोखा आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. तीन लेखकांची यापूर्वीच हत्या झाली असून अंधविश्वासाविरुद्ध लढा देणारे कन्नड लेखक के. एस. भगवान यांच्या जिवाला धर्मांध शक्तींकडून धोका आहे; परंतु सरकारकडून मात्र लेखक, कार्यकर्ते आणि समाजाच्या इतर वर्गातील लोकांमध्ये वाढती भीती कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली नाहीत. - सारा जोसेफ, मल्याळी लेखिका

Web Title: Protest against the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.