धूम्रपानाचा विरोध बेतला जिवावर, 21 वर्षीय विद्यार्थ्याची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:32 PM2017-09-21T20:32:13+5:302017-09-21T20:34:05+5:30
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. धूम्रपाण करण्यापासून रोखणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे
नवी दिल्ली, दि. 21 : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, अनेक नागरिक याचे उल्लंघन करताना दिसून येते. याचा इतर नागरिकांना त्रास होतो, याची त्यांना जराही जाणीव नसते. राजधानी नवी दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाला रोखणाऱ्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. धूम्रपाण करण्यापासून रोखणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्या तरुणाचे नाव गुरप्रीत असे आहे.
राजधानी दिल्लीमध्ये गुरप्रीत फोटोग्राफीचा विद्यार्थी आहे. गुरप्रीत सिंग आणि त्याचा 22 वर्षीय मित्र मणिंदर सिंग रात्रीच्या वेळी डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी निघाले होते. रात्री एकच्या सुमारास सफदरजंग हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेलपाशी ते थांबले होते. त्यावेळी आरोपी रोहित कृष्ण महंत त्यांच्याजवळ उभा राहून धूम्रपान करायला लागला. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करत असल्याने दोघांनी त्याला हटकलं. संतापलेल्या आरोपीने गुरप्रीत आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ केली आणि तिघांमध्ये बाचाबाची झाली. इतरांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोघं जण त्यांच्या बाईकवरुन निघून गेले.
रोहितच्या मनात मात्र राग धुमसत होता. त्याने आपल्या गाडीने दोघांच्या बाईकचा पाठलाग केला. दोघांनी जेमतेम 400 मीटर अंतर पार केलं असेल, त्याचवेळी रोहितच्या कारने बाईक जोरदार धडक दिली. कारखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या गुरप्रीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मणिंदरवर उपचार सुरु आहेत.