केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:53 PM2024-03-14T17:53:37+5:302024-03-14T17:54:38+5:30

'पाकिस्तानी लोकांना माझ्या घरासमोर गोंधळ घालायची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही.'

Protest of Pakistani refugees outside CM Arvind Kejariwal's house, Chief Minister's attack on central govt | केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

नवी दिल्ली: पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejariwal) यांच्या घराबाहेर निदर्शने केली. निदर्शनादरम्यान निर्वासितांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. निर्वासितांचे म्हणणे आहे की, केजरीवालांनी CAA कायद्याबद्दल दिशाभूल करणारे विधान केले, ज्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. दरम्यान, आपल्या घराबाहेर निदर्शन पाहून केजरीवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

केजरीवाल सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की, आज काही पाकिस्तानी लोकांनी माझ्या घरासमोर निदर्शने करून गोंधळ घातला. दिल्ली पोलिसांनी त्यांना पूर्ण सन्मान आणि संरक्षण दिले. यांना माझ्या घराबाहेर पोलीस संरक्षणात आंदोलन करण्याची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही? भारतीय शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या कांड्या, लाठ्या-काठ्या, गोळ्या झाडल्या जातात अन् पाकिस्तानींना एवढा मान मिळतो? भाजपचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्यात एवढी हिंमत होते की, दिल्लीच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या देशात घुसून माफी मागायला सांगतात, आणि भाजप त्यांना पाठिंबा देते. माझा द्वेष करता करता भाजप पाकिस्तानींच्या पाठीशी उभा राहिला. 

केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अमित शाह यांच्या सीएएवरील विधानालाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, या CAA नंतर हे पाकिस्तानी देशभर पसरतील आणि आपल्याच देशातील लोकांना त्रास देतील. सीएए देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढेल. बाहेरुन लोक आले, तर नोकऱ्या कुठून देणार? तुमच्यामुळेच रोहिंग्या भारतात आले. CAA मुळे 1947 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल. इतके लोक भारतात आले तर सरकार त्यांना रोजगार कसा देणार? पंतप्रधान आपली व्होट बँक वाढवण्यासाठी हे करत आहेत. हे भाजपचे व्होट बँकेचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

Web Title: Protest of Pakistani refugees outside CM Arvind Kejariwal's house, Chief Minister's attack on central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.