आंदोलक शेतक-यांची रेल्वे १६० किलोमीटर भरकटली, दिल्लीच्या मोर्चाहून परत येतानाची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:02 AM2017-11-23T05:02:59+5:302017-11-23T05:03:34+5:30
बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली
संतोष बामणे
बिनमोर (मध्य प्रदेश) : नवी दिल्ली येथून भारतीय किसान संसदेचा मोर्चा आटोपून आंदोलक शेतक-यांना घेऊन कोल्हापूरकडे परतणारी ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी तब्बल १६० किलोमीटर भरकटली. बिनमोर (मध्य प्रदेश) स्टेशन आल्यानंतर ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यावर शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ या १८ बोगींच्या रेल्वेतून दोन हजार शेतकरी गेले होते. मोर्चा संपल्यानंतर मंगळवारी रात्री सफदरगंज स्थानकातून ही गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली. सकाळी साडेसात वाजता मध्य प्रदेशमधील बिनमोर रेल्वेस्थानकात ती आली. यावेळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी ही गाडी पुढे सोडली नाही. गाडी का थांबली, याबाबतची विचारणा केल्यावर शेतकºयांना हा प्रकार समजला. आग्रा रेल्वे स्टेशनच्या सिग्नल नियंत्रण यंत्रणेच्या चुकीमुळे गाडी तब्बल १६० किलोमीटर अंतर कापून चुकीच्या दिशेने आली होती. संतप्त शेतकºयांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून मोदी सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर रेल्वे पुन्हा बिनमोर -झासी - ग्वालियर - बिना - भोपाळ -मनमाड - भुसावळ - दौंड - पुणे मार्गे वळविण्यात आली. गुरुवारी रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोहोचणे अपेक्षीत आहे.
>चौकशी करा
लाखोंच्या संख्येने शेतकरी मोर्चासाठी आले होते. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे १५०० हून अधिक शेतकºयांचा जीव धोक्यात आला. याच्यामागे कोणाचा हात आहे, त्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा ‘स्वाभिमानी’शी गाठ आहे.
- खासदार राजू शेट्टी.