आंदोलकांची काळजी घेत आहेत स्वयंसेवी संस्था, रोजचे जेवण व अन्य सुविधा पुरविण्यासाठी गुरुद्वारांचाही पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:04 AM2020-12-21T05:04:28+5:302020-12-21T05:04:49+5:30
Farmers Protest : सिंघू सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण पुरविण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या हजारो शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण व अन्य सुविधा पुरविण्यासाठी गुरुद्वारा, तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. आंदोलकांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा, याचीही काळजी घेण्यात येत आहे.
सिंघू सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना रोजचे जेवण पुरविण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे. जिथे आंदोलन सुरू आहे, तिथे एक व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्याच्याच जवळ या समितीने भव्य तंबू बांधला आहे. तिथे आंदोलकांसाठी जेवण तयार होऊन त्याचे दररोज वाटप केले जाते. रात्री विश्रांतीकरिता स्त्री व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे तंबू दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने आंदोलनस्थळी उभारले आहेत. यासाठी समितीला अनेकांकडून सढळ हस्ते देणग्याही मिळत आहेत.
आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी बाबा काश्मीरसिंगजी भुरीवाले पंथाच्या संघटनेकडून लंगर चालविण्यात येत आहे. आंदोलकांसाठी एक वेळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण बनविण्यासाठी स्वयंसेवकांची दररोज पहाटेपासून लगबग सुरू असते. दररोज लागणाऱ्या वस्तूंचेही वाटप खालसा एड या संस्थेने आंदोलकांना टुथपेस्ट, साबण, ब्लँकेट अशा दररोज लागणाऱ्या गोष्टी पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कार्याला पंजाबमधील तरणतारण येथील डेरा बाबा जगतारसिंग, तसेच अन्य संस्थांचेही पाठबळ लाभले आहे.