"खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करा", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ 'खाप'ची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 07:08 PM2023-05-21T19:08:17+5:302023-05-21T19:09:04+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत.
रोहतक : राजधानी दिल्ली येथे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवानांची 'कुस्ती' अद्याप सुरू आहे. २३ एप्रिलपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आता 'खाप पंचायती'ने उडी घेतली आहे. हरयाणाच्या रोहतकमध्ये खाप पंचायतीने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बैठक घेतली. लैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेले भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दबाव आणण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे खाप पंचायतीने २३ मे रोजी कुस्तीपटूंच्या कँडल मार्चमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. रोहतकमधील बैठक सर्व खाप पंचायतीचे प्रमुख मेहर सिंग नंबरदार यांनी बोलावली होती. आंदोलक पैलवानांच्या समर्थनार्थ या बैठकीत जवळपास १५०० खाप नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
आज अल्टीमेटम संपला
इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. सर्वजण एका ठिकाणी जमतील. शेतकरी आंदोलनाप्रमाणे कुस्तीपटूंचे हे प्रदर्शन दीर्घकाळ चालणार आहे. आंदोलक पैलवानांनी केंद्राला दिलेला १५ दिवसांचा अल्टिमेटम आज संपत असताना ही खाप बैठक झाली. पैलवानांनी केंद्र सरकारला ९ मे रोजी अल्टिमेटम दिला होता, जो आज २१ मे रोजी संपला.
VIDEO | “The committee has decided to hold a candle march at India Gate on May 23 and subsequently a meeting on May 28,” says farmer leader Rakesh Tikait after Khap Panchayat in support of wrestlers' protest concludes. pic.twitter.com/zqXGPkIs7l
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2023
आखाड्याबाहेरील कुस्ती
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.