शाहीनबागमधील आंदोलनाविरोधात दिल्लीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 02:45 PM2020-02-02T14:45:07+5:302020-02-02T14:53:01+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे मोठे आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे मोठे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हे आंदोलन आणि तिथे जमलेल्या आंदोलकांविरोधात काही जण रस्त्यावर उतरले असून, शाहीनबागमधील आंदोलकांना तिथून हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी या मंडळींकडून करण्यात येत आहे.
गेल्या 50 दिवसांपासून शाहीनबाग येथे एनआरसी आणि सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलनामुळे येथील रस्ता बंद असल्याने स्थानिक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आंदोलकांविरोधात हे लोक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, आपण कुठल्याही पक्षाशी निगडीत नसल्याचा दावा या मंडळींकडून करण्यात येत आहे. मात्र यापैकी अनेक जण बजरंग आखाडा समिती, गोरक्षा, बजरंग दल या संघटनांशी संबंधित आहेत.
Delhi: DCP Chinmoy Biswal is present at the spot, where people are holding a protest against the Shaheen Bagh protest over #CitizenshipAmendmentAct. https://t.co/NweeAm3ToMpic.twitter.com/Eb1Hc8qKZv
— ANI (@ANI) February 2, 2020
शाहीनबाग येथे बसलेल्या आंदोलकांपासून हे आंदोलक 300 मीटर अंतरावर आहेत. येथे जमलेल्या लोकांमध्ये स्थानिकांसोबतच फरिदाबाद, बागपत, बल्लभगड येथील आंदोलकांचा समावेश आहे. आमचा आंदोलनाला विरोध नाही. मात्र आंदोलकांनी रस्ता मोकळा करावा, हवंतर या मंडळींनी रामलीला मैदान किंवा जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे, असे शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी सांगितले.