महात्मा गांधींच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा, विरोधकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 04:57 PM2021-01-12T16:57:38+5:302021-01-12T17:03:25+5:30
BJP Flag Found Draped Around Gandhi Statue: माकपचे युवा युनिट डीवायएफआयने या घटनेविरोधात मोर्चा काढून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
बंगळुरु : केरळमध्ये जय श्री राम असे बॅनर लावल्याची घटना घडल्यानंतर सोमवारी पलक्कड येथील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा गुंडाळल्याचे निदर्शनास आले. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या झालेल्या प्रकाराबद्दल भाजपाने स्वत: ला दूर केले आहे. तर माकपचे युवा युनिट डीवायएफआयने या घटनेविरोधात मोर्चा काढून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. काँग्रेस आणि त्यांच्या युवा संघटनेनेही या विरोधात स्वतंत्र मोर्चा काढला.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती मास्क घालून पालिकेच्या इमारतीवर चढून गांधींच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा बांधताना आणि नंतर खाली उतरताना दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, पालिका सचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही अद्याप दोषींना ओळखू शकलो नाही. कारवाई चालू आहे.
माकप आणि काँग्रेसकडून या घटनेचा निषेध
डीवायएफआय, माकपच्या युवा संघटनेने निषेध मोर्चा काढून पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि त्याच्या युवा संघटनेनेही स्वतंत्र मोर्चा काढला. त्यानंतर माकप आणि काँग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी पालिका अध्यक्षांच्या दालनासमोर आंदोलन केले आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नाव न देण्याच्या अटीवर भाजपा नेत्यांनी सांगितले की, या घटनेत पक्ष सामील नाही. त्यांनी याबाबत सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अखेर भाजपाच्या झेंड्यावर का गोंधळ उडाला?
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा लावल्यानंतर खळबळ उडण्याचे मुख्य कारण म्हणजे जय श्री रामचे बॅनर. केरळमध्ये डिसेंबर महिन्यात स्थानिक निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळविला आहे. नगर पालिकेत भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्सव साजरा करताना काही कार्यकर्ते पलक्कड नगरपालिका इमारतीवर चढले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पोस्टर लावले. दुसरीकडे, काही कार्यकर्त्यांनी त्यावर 'जय श्री राम' असे लिहिलेले बॅनर लावले.